मुंबई - समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी उर्दू व अल्पसंख्याक समाजातल्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा आलीच पाहिजे. यासाठी मराठी भाषा सक्षमीकरण मोहीम (फौंडेशन वर्ग) ५ वीपासूनच राबवली पाहिजे. यासंदर्भातला अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगानेच ठरवावा, अशी एकमुखी मागणी आज उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकविणार्या मानसेवी शिक्षकांनी केली.
राज्य अल्पसंख्याक आयोगाने ‘मराठी भाषा बळकटीकरण’ या विषयावर आज सह्याद्री अतिथीगृह येथे एक दिवसाची कार्यशाळा आयोजित केली होती. राज्यातल्या विविध भागांतून उर्दू माध्यमाच्या शाळांमधून मराठी भाषा शिकविणार्या मानसेवी शिक्षकांनी या कार्यशाळेत सहभाग मोठ्या प्रमाणावर घेतला. त्यावेळी त्यांनी आपापल्या सूचना मांडताना उर्दू माध्यमाच्या शाळांमधील ८ वी, ९ वी, १० वी या वर्गातल्याच विद्यार्थ्यांऐवजी पाचवीपासूनच मराठी भाषा फौंडेशन वर्ग राबवून मराठी शिकवण्याबाबतचा निर्णय घ्यावा, अभ्यासक्रम आयोगानेच ठरवून द्यावा, अशा मागण्या केल्या.
यावेळी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मुनाफ हकीम यांनी मराठी भाषा समृद्ध, बळकट झाली पाहिजे यासाठी आयोग सर्वतोपरी प्रयत्न करील. आयोगाच्या अंतर्गत कार्यरत असणार्या शिक्षकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करील, अशी ग्वाही दिली.
No comments:
Post a Comment