मुंबईला ४२०० एमएलडी पाण्याची गरज असताना मुंबईला फक्त ३५०० एमएलडी पाणी मिळत आहे. मुंबई मध्ये एकीकडे पाणी कमी मिळत असताना मुंबई मध्ये पडणाऱ्या पावसाचे पाणी सुद्धा फुकट जात आहे. यामुळे मुंबई महानगर पालिकेच्या हद्दीमध्ये नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारती तसेच जुन्या इमारतींची पुनर्बांधणी करताना पावसाचे पाणी वाचवण्यासाठी रेन हार्वेस्टिंग करणे गरजेचे केले आहे.
शुक्रवारी १ मार्च रोजी पालिकेमध्ये जेष्ठ नागरिकांना सोबत घेवून मुंबई मध्ये पाणी वाचवण्याबाबत जनजागृती करण्यासाठी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळे प्रसंगी मार्गदर्शन करताना मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनी रेन हार्वेस्टिंग न करता ज्या इमारतींना ओ.सी. दिली आहे त्या संबंधित अधिकाऱ्यांची विजिलन्स विभागाद्वारे चौकशी करावी तसेच रेन हार्वेस्टिंग बाबत मिडिया मधून ताशेरे ओढले जात असल्याने रेन हार्वेस्टिंगची खरी परिस्थिती मुंबईच्या लोकांसमोर येण्यासाठी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी श्वेतपत्रिका काढावी असे आवाहन महापौरांनी केले आहे.
मुंबई मध्ये साढे तीन लाखाहून जास्त इमारती आहेत त्यापैकी ३५०० इमारतीमध्येच रेन हार्वेस्टिंग करण्यात आले आहे. इतर ३५०० इमारतींमध्ये रेन हार्वेस्टिंग करण्यात आलेले नसल्याने या इमारतींचे ओ.सी. प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही असे महापौरांनी सांगितले आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या इमारती पूर्ण होण्या आधी प्रत्येक इमारतीमध्ये पावसाचे पाणी वाचवण्यासाठी रेन हार्वेस्टिंग करणे पालिकेने बंधनकारक केले आहे. रेन हार्वेस्टिंग केल्या नंतर पूर्ण झालेल्या इमारतींना पालिकेद्वारे ओ.सी. प्रमाणपत्र दिले जाते. हे ओ.सी.प्रमाणपत्र दिल्याशिवाय पुनर्बांधणी झालेल्या इमारतीमध्ये रहिवाश्यांना राहता येत नाही.
ओ.सी. घेण्यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांचा आणि बिल्डरचा थेट संबंध येत असल्याने अधिकारी आणि बिल्डर यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार होऊन ओ.सी. दिल्या जातात हे सर्वांनाच माहित आहे. अशा कित्तेक ओ.सी. पालिका अधिकाऱ्यांनी बिल्डरला खुष करण्यासाठी आणि आपली स्वतःची घरे भरण्यासाठी दिल्या आहेत. यामुळे मुंबई मध्ये झपाट्याने इमारतींची पुनर्बांधणी केली जात असताना लोक या इमारतींमध्ये रहावयास आली असतानाही या इमारतीमध्ये रेन हार्वेस्टिंग केली नसल्याचे चित्र मुंबईमध्ये सर्वत्र दिसत आहेत.
या सर्व प्रकारवरून मुंबई मध्ये किती इमारतीची पुनर्बांधणी केली जात आहे, किती इमारती बांधून तयार आहेत, किती इमारतींमध्ये रेन हार्वेस्टिंग प्रकल्प राबवण्यात आला आहे, किती इमारतीना रेन हार्वेस्टिंग प्रकल्प न राबवता ओ.सी. प्रमाणपत्र देण्यात आले आहे याची खरी आकडेवारी मुंबईच्या नागरिकांसमोर येण्याची गरज आहे. तसेच रेन हार्वेस्टिंग प्रकल्प न राबवता ओ.सी. देणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांची चौकशी होऊन कारवाही होणे गरजेचे असल्याने पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी रेन हार्वेस्टिंग बाबत श्वेतपत्रिका काढून सत्य परिस्थिती मुंबईच्या नागरिकांसमोर आणावी हि अपेक्षा मुंबईकर करत आहेत.
अजेयकुमार जाधव
मो.९९६९१९१३६३
No comments:
Post a Comment