मुंबई : देशातील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांवर सरकारचा धाक राहिला नाही, बलात्कार्यांना फासावर लटकविण्याचा कायदा त्वरित मंजूर करा, अशी मागणी रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. माटुंगा येथील सामूहिक बलात्काराचा निषेध करण्यासाठी रविवारी रिपाइं कार्यकर्त्यांनी माटुंगा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. माटुंग्यातील सामूहिक बलात्कार आणि मध्य प्रदेशात विदेशी महिलेवरील बलात्कारावरून महिलांच्या संरक्षणार्थ असलेल्या सरकारी यंत्रणेतील फोलपणा दिसून येतो, असे आठवले म्हणाले. माटुंगा बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून त्वरित शिक्षा करण्याची मागणी या वेळी रिपाइंने केली. महिला अत्याचार विरोधी कायदा त्वरित मंजूर करावा आणि शरीरसंबंधांची १६ वर्षांची अट रद्द करावी, अशी मागणी या वेळी रिपाइंने केली आहे.
बलात्कार प्रकरणी ५ जणांना अटक
माटुंगा सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. यापैकी एका आरोपीचे नाव गणेश इंगळे (२0) असे असून तो कॅटरिंग सेवेत कामगार म्हणून काम करतो. सायन-माटुंगा रेल्वे ट्रॅकलगतच्या जागेत शेती करणार्या या दाम्पत्याच्या घरात शुक्रवारी रात्री ११.३0 वा. सातजण घुसले होते. त्यांनी महिलेच्या पतीला मारहाण करून घराबाहेर काढल्यानंतर महिलेवर अत्याचार केला. या ७ जणांपैकी दोघेजण पीडितेच्या पतीच्या परिचयाचे आहेत. यांची नावे सिद्धु व अनुप अशी आहेत. माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश परब यांनी सांगितले की, पोलिसांची तीन स्वतंत्र पथके आरोपींचा शोध घेत आहेत. उर्वरित आरोपींना लवकरच पकडले जाईल, असे त्यांनी सांगितले. इंगळेच्या चौकशीतून आणखी आरोपी लवकरच जेरबंद करण्यात येतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
No comments:
Post a Comment