मुंबई : देशभरातून येणार्या वाढत्या संख्येमुळे पालिकेच्या महत्त्वाच्या केईएम, सायन व नायर रुग्णालयांमध्ये हृदयविकाराच्या अनेक शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत. या तीन रुग्णालयांत मिळून दीड हजारांहून अधिक शस्त्रक्रिया केल्या जातात. वाढत्या हृदयरोग रुग्णामुळे हृदयशस्त्रक्रियांची ७६५ची वेटिंग लिस्ट तयार झाली आहे. ही प्रतीक्षा यादी महिन्याभरात संपवण्याचे निर्देश गुरुवारी स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी दिले. यानुसार पालिका या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक चार 'हार्टलेग' मशीन खरेदी करणार असून काही रुग्णांना पालिकेच्या खर्चाने फोर्टीज, सेव्हन हिल्स, कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात पाठवून असलेली प्रतीक्षा यादी संपवली जाणार आहे.
जानेवारी २0१२ ते मार्च २0१३ यादरम्यान केईएम, नायर आणि सायन रुग्णालयांत ९८४ हृदयशस्त्रक्रिया करण्यात आल्या तरीही अद्याप या तीनही रुग्णालयांत मिळून ७६५ची प्रतीक्षा यादी आहे. हृदयविकाराने होणारे मृत्यू रोखण्यासाठी अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी स्थायी समितीसमोर गुरुवारी निवेदन केले.
महाराष्ट्र शासनाची जे. जे., सेंट जॉर्ज, जी. टी. या सारखी रुग्णालये आहेत, मात्र यापैकी कोणत्याही रुग्णालयांमध्ये १0 किलोपेक्षा कमी वजन असलेल्या बालकांवर शस्त्रक्रिया होत नाहीत. ही शस्त्रक्रिया केवळ पालिकेच्या केईएम रुग्णालयातच केली जाते. अशी २८८ बाळके सध्या हृदयशस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत. या व्यतिरिक्त कोकिलाबेन रुग्णालय, सेव्हन हिल्स, फोर्टीज या रुग्णालयांमध्ये या शस्त्रक्रिया केल्या जातात. पालिका राजीव गांधी योजनेंतर्गत या रुग्णालयांत बालकांना पाठविणार आहे.
पालिका करणार चार हार्टलेग मशिन्सची खरेदी
पालिका रुग्णालयांमध्ये हृदयशस्त्रक्रियेसाठी येणार्या रुग्णांची प्रतीक्षा यादी महिन्याभरात संपवा, असे आदेश गुरुवारी शेवाळे यांनी दिले. यासाठी प्रसंगी रुग्णाच्या शस्त्रक्रियेचा खर्च उचलून त्यांना खाजगी रुग्णालयांत पाठवून शस्त्रक्रिया कराव्यात, असे शेवाळे यांनी सांगितले. त्याचबरोबर अन्य कोणत्या आजारांची शस्त्रक्रियांची प्रतीक्षा यादी आवश्यक मशिनरी तसेच कर्मचारी यांचा अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले. आवश्यक बाबींची टेंडर काढण्यास पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्यामुळे विलंब होत असल्याने हे खाते बंद करून अशा आवश्यक मशिनरी खरेदी करण्याचे अधिकार खातेप्रमुखांना देण्यासाठी धोरण तयार करावे, असे निर्देश राहुल शेवाळे यांनी या वेळी दिले.
No comments:
Post a Comment