डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्रावर रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्यात आली असे सांगण्यात येत असले तरी प्रत्येक नेत्याने आंबेडकरी व दलित जनतेला वाऱ्यावर सोडून आपले स्वताचे गट कसे मजबूत होतील याची काळजी घेतल्याने आज या रिपब्लिकन पक्षाची शकले उडाली आहेत. आज रिपब्लिकन नेत्यांकडून जनतेचे भले करण्यापेक्षा आपला स्वताचा राजकीय स्वार्थ कसा जपला जाईल याचा विचार केला जात आहे. जनतेचे कार्यकर्त्यांचे भले झाले नाही तरी फक्त मला मात्र सर्व मिळू दे अशी धारणा रिपब्लिकन नेत्यांची झाली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या रिपब्लिकन पक्षाकडून दलित व आंबेडकरी जनतेच्या खूप अपेक्षा आहेत. आज खुले आम सर्वत्र दलित व आंबेडकरी लोकांवर खुले आम अत्याचार सुरु आहे. असे अत्याचार या आधीही सुरु होते पण ते कधी उघडकीस येत नव्हते. जातीवादी प्रशासनिक अधिकारी व राजकारण्यांमुळे असे प्रकार उघडकीस येवू नये म्हणून साम, दाम, दंड, भेद या सर्व प्रकारांचा वापर करून असे प्रकार कित्तेक वर्षे दाबले गेले. परंतू आता आंबेडकरी जनता उच्च शिक्षित व आर्थिक दृष्ट्या बलवान होत चालल्याने बाबासाहेबांनी सांगितल्या प्रमाणे शिकून संघटीत होत असून संघर्ष करू लागल्याने असे प्रकार उघडकीस येवू लागले आहेत.
बाबासाहेबांची आंबेडकरी जनता बदलली आहे. अन्याय सहन करणारी जनता अन्याय अत्याचार विरोधात आवाज उठवू लागली आहे. अन्याय अत्याचार विरोधातील आंबेडकरी जनतेचा आवाज रिपब्लिकन नेत्यांनी आपल्या माध्यमातून सरकार दरबारी मांडून अत्याचार बंद करण्याचा सज्जड दम देण्याची गरज असताना रिपब्लिकन नेत्यांच्या गुळगुळीत व प्रेमळ भाषेतील मागण्यांमुळे आंबेडकरी जनतेला न्याय मिळायचा सोडून अन्याय अत्याचारा मध्ये वाढ होत आहे. रिपब्लिकन नेत्यांना एखादे आश्वासन दिले कि ते खुश होणारे असल्याने कारवाई करू इतके आश्वासन देवून सत्ताधारी रिपब्लिकन नेत्यांना टोपी लावत आहेत. रिपब्लिकन नेत्यानाही सरकार व सत्ताधारी आपल्याला टोपी लावतात हे जरी माहित असले तरी आम्ही मंत्र्यांना भेटलो यामध्येच नेतेही समाधानी होत असून सत्ताधाऱ्यानी या नेत्यांना लावलेली टोपी जनतेला लावू पाहत आहेत.
या रिपब्लिकन नेत्यांच्या अशा टोपी लावून घेण्याच्या प्रवृत्तीमुळेच अहमदनगर सोनई येथे तीन तरुणांचे हत्याकांड झाले आहे. बारामतीमध्ये अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यासाठी भांडणार्या चंद्रकात गायकवाड यांची हत्या झाली आहे. श्रीरामपूर येथे दलित महिलेची हत्या झाली आहे. जालना येथे बुद्ध विहाराच्या जागे वरून विकास निकाळजे याचा विष प्रयोग करून खून झाला आहे. या प्रकरणात एका मंत्र्यांचे नाव पुढे आले आहे. सतारा येथे बौद्ध पती पत्नीच्या खुनाचा प्रयत्न झाला आहे. भंडारा येथे तीन दलित मुलींचे हत्याकांड झाले आहे.
असे प्रकार घडल्यावर आंबेडकरी जनतेला दाखवण्यापुरता प्रत्येक नेत्याने आपल्या गटाच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शने करून, मोर्चे काढून स्वताची प्रसिद्धी करून घेतली आहे. या पिडीत लोकांना लोकांना अद्याप न्याय मिळालेला नसला तरी निदर्शने करून मोर्चे काढून आपली ताकद किती हे दाखवून येणाऱ्या निवडणुकीसाठीच्या सेटिंगचे गणित जुळवण्याची तयारी रिपब्लिकन नेत्यांनी सुरु केली आहे हे आता लोकांना कळू लागले असल्याने आंबेडकरी नेत्यांनी याचा विचार करण्याची गरज आहे. येत्या आठवड्यात ११ मार्चला आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेची, १५ मार्चला पुण्याच्या सचिन खरात यांच्या प्यान्थर रिपब्लिकन, १६ मार्चला प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा विविध मागण्यांसाठी मुंबई मध्ये तर १३ मार्चला दिल्ली येथे रामदास आठवले यांच्या गटाचा मोर्चा आयोजित केला आहे.
दलितांवर आंबेडकरी जनतेवर अन्याय, अत्याचार होत असताना वेगवेगळी निदर्शने करण्यापेक्षा व वेगवेगळे मोर्चे काढण्यापेक्षा आंबेडकरी व दलित जनतेवर होणारे अन्याय अत्याचाराविरोधात सर्व आंबेडकरी दलित नेत्यांनी एकत्रित एवून लढा देण्याची गरज आहे. निवडणूक जवळ आली असल्याने सर्वच आंबेडकरी नेत्यांना आपले हितसंबंध असलेल्या राजकीय पक्षाला दुखवून चालणार नसले तरी दलित व आंबेडकरी जनतेवर होणारया अत्याचाराविरोधात एकत्रित लढण्याचे टाळल्यास रिपब्लिकन दलित नेत्यांना दलितांवरील अन्याय अत्याचार पेक्षा स्वतःचा राजकीय स्वार्थ महत्वाचा वाटत असल्याचा संदेश जनते समोर जाईल याची दखल घेण्याची गरज आहे.
अजेयकुमार जाधव
मो.९९६९१९१३६३
No comments:
Post a Comment