दलिताला ठार मारण्याची धमकी पारनेर पोलिसांचे दुर्लक्ष - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 March 2013

दलिताला ठार मारण्याची धमकी पारनेर पोलिसांचे दुर्लक्ष


मुंबई : शेतजमिनीची मोजणी करत असताना दलिताला मारहाण शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देणार्‍याविरोधात पारनेर पोलीस काहीच कारवाई करत नसल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षकांकडेही दाद मागूनही न्याय मिळत नसल्याने दोन मुकबधीर मुलांसह हे कुटुंब जीविताच्या भीतीने लपून राहत आहे. 

राज्यातील दलितांवरील अन्याय, अत्याचारांच्या वाढत्या घटनांमुळे ग्रामीण भागात राहणार्‍या दलितांच्या मनात कशी दहशत निर्माण होते याचे ताजे उदारहण अहमदनगर, पारनेर, पाडळी, आळे येथे राहणार्‍या प्रमोद शांताराम शिंदे (४४) या दलिताचे देता येईल. शेतमजुरी करणारे शिंदे १४ मार्च रोजी त्यांच्या वतनाच्या शेतीची खाजगी मोजणी सुरू असताना अशोक नामदेव डेरे (३२) हा इसम तेथे आला आणि त्याने शिंदे यांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. त्यांची पत्नी व इतरांना त्यांची डेरे यांच्या पासून सुटका केल्यानंतर पारनेर पोलीस माझ्या खिशात असल्याचे सांगून तुला बघून घेतो, असे म्हणून शिंदे यांना धमकावले. दोन मुकबधीर मुलांचे संगोपन करण्यासाठी शेतमजुरीबरोबरच मिळेल ते काम करणार्‍या शिंदे या प्रकारामुळे घाबरल्याने त्यांनी आपल्या कुटुंबाला इतरत्र पाठवून स्वत: पारनेर पोलीस ठाण्यात डेरेच्या विरोधात तक्रार देण्यासाठी दाखल झाले. 

मात्र अनेक हेलपाटे मारूनही त्यांची तक्रार पारनेर पोलिसांनी घेतली नाही. त्यामुळे शिंदे यांनी अहमदनगर येथे जाऊन पोलीस अधीक्षक आर. डी. शिंदे यांच्याकडे तक्रार अर्ज केला. मात्र त्याचा अद्याप काहीच परिणाम झाला नसून शिंदेंची तक्रार पारनेर पोलिसांनी घेतली नसल्याने हे कुटुंब आपला घर, कामधंदा सोडून भीतीपोटी इतरत्र भटकत आहे. याबाबत पारनेर पोलीस ठाण्याचे पोनि. सुनील शिवरकर यांच्याशी संपर्क साधला असता, शिंदे यांच्या तक्रारीत सत्यता आढळल्यास आम्ही तक्रार नोंद करण्यास तयार आहोत, असे म्हटले आहे. मात्र पोलीस ठाण्यात तक्रारदार येतो त्याचे समाधान करणे पोलिसांचे कर्तव्य असते. ते कर्तव्यच पोलीस विसरत असल्याचे अशा प्रकारावरून उघड होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad