मुंबई : सुप्रीम कोर्टाने शिक्षा सुनावलेल्या अभिनेता संजय दत्तचा पुळका आलेल्या माजी न्यायमूर्ती काटजू, खा. जया बच्चन, खा. जया प्रदा व खा. शत्रुघ्न सिन्हा यांनी संजय दत्तला बाहेर ठेवून त्याची सजा भोगावी, असे संतप्त उद्गार शनिवारी दादर येथे झालेल्या पुरोगामी प्रोग्रेसिव्ह ग्रुपतर्फे आयोजित सभेत अनेक वक्त्यांनी काढले. कोतवाल गार्डन येथे झालेल्या या सभेला प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.
या सभेत बोलताना प्रा. आजगावकर, कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहन केळुसकर, भाऊसाहेब परब, रमाकांत जाधव या मान्यवरांनी काटजू, जया बच्चन व जया प्रदा यांचा तीव्र शब्दात निषेध केला. १९९३ साली झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात एकूण ३00 निष्पाप नागरिकांना आपल्या प्राणास मुकावे लागले तर ४00हून अधिक जणांना कायमचे अपंगत्व आले. असे असताना सुप्रीम कोर्टाने शिक्षा सुनावलेल्या अभिनेता संजय दत्त याचा पुळका या तथाकथित लोकांना आल्यामुळे त्यांच्याबद्दल जनतेत कमालीचा संताप पसरला आहे. कोर्टाच्या निर्णयाचा आदर करून संजयने दिलेली शिक्षा भोगलीच पाहिजे, अन्यथा संजयला मोकाट सोडून काटजू, जया बच्चन व जयाप्रदा यांनी त्याची शिक्षा विभागून भोगली पाहिजे. बॉम्बस्फोटातील आरोपींकडून एके ५६ रायफल घेऊन त्याची शहाजोगपणे विल्हेवाट लावणारा संजय हा कोणी देशभक्त नाही. त्याने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याला भोगावीच लागेल. त्यासाठी त्याला कोणत्याही प्रकारची दया दाखविता येणार नाही. संजयची शिक्षा कमी केल्यास बॉम्बस्फोटात मरण पावलेल्या नागरिकांचा अपमान केल्यासारखे होईल, असे या वक्त्यांनी आपले मत मांडताना सांगितले.
No comments:
Post a Comment