पोलीस दलात अवघ्या ५.३३ टक्के महिला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 April 2013

पोलीस दलात अवघ्या ५.३३ टक्के महिला


नवी दिल्ली : देशाच्या कायदा अंमलबजावणी यंत्रणेत महिलांचा सहभाग वाढवण्याची मागणी जोरकसपणे होत असली तरी सद्यस्थितीत देशाच्या पोलीस दलात अवघ्या ५.३३ टक्के महिला कार्यरत असल्याचे कटू वास्तव पुढे आले आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, विद्यमान परिस्थितीत विविध राज्यांकडे सुमारे १५ लाख ८५ हजार ११७ पोलीस कर्मचार्‍यांचा ताफा असून त्यात महिला पोलिसांचा वाटा अवघा ८४ हजार ४७९ अर्थात ५.३३ टक्के एवढा आहे. याशिवाय देशातील १५ हजार पोलीस ठाण्यांपैकी अवघ्या ४९९ पोलीस ठाण्यांतच 'महिलाराज' असल्याचेही या आकडेवारीतून पुढे आले आहे. गेल्या १६ डिसेंबरला राजधानी नवी दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्काराच्या 'त्या' क्रूर घटनेनंतर देशातील महिला पोलीस कर्मचार्‍यांची संख्या वाढवण्याची मागणी होत आहे. 

तत्पूर्वी २0११ मध्येही महिला अत्याचारांच्या सुमारे २ लाख २८ हजार ६५0 घटना घडल्या होत्या. त्यातील २४ हजार २0६ घटना बलात्काराच्या होत्या, हे विशेष. उत्तर प्रदेशातील १ लाख ७३ हजार ३४१ पोलिसांपैकी अवघ्या २ हजार ५८६ (१.४९ टक्के) महिला पोलीस आहेत तर आंध्र प्रदेशच्या ८९ हजार ३२५ पोलिसांत २ हजार ३१ (२.२७ टक्के) महिला पोलीस आहेत. याशिवाय बिहारच्या ६७ हजार ९६४ पोलिसांपैकी १ हजार ४८५ (२.१८ टक्के) महिला पोलीस आहेत. २0११ मध्ये बलात्काराच्या सर्वाधिक घटना घडलेल्या मध्य प्रदेशाकडे ७६ हजार ५0६ पोलिसांचा ताफा असून त्यात ३ हजार १0 महिला पोलिसांचा समावेश आहे. विशेष म्हणजे वरील राज्यांपेक्षा महाराष्ट्र, तामिळनाडू या राज्यांसह चंदिगड या केंद्रशासित प्रदेशातील महिला पोलिसांची संख्या समाधानकारक आहे.

महाराष्ट्राच्या १ लाख ३४ हजार ६९६ पोलिसांच्या ताफ्यात २0 हजार ६२ (१४.८९ टक्के) महिला पोलीस आहेत. याशिवाय तामीळनाडूच्या ९५ हजार ७४५ पोलिसांत १0 हजार ११८ (१0.५७ टक्के) तर चंदिगडच्या ७ हजार ३0८ पोलिसांपैकी ९८५ महिला पोलीस आहेत. दरम्यान, राजधानी नवी दिल्लीच्या ७५ हजार १६९ पोलिसांत ५ हजार ३५६ (७.१३ टक्के) महिला पोलिसांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad