वैद्यकीय क्षेत्रावरील राजकीय आणि शासकीय दबावामुळे उत्तम डॉक्टर टिकत नसल्याची खंत डॉ. अशोकराव कुकडे यांनी व्यक्त केली.
दादर येथील रवींद्र नाट्य मंदिरात नाना पालकर स्मृती समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मुक्त संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. सेवाक्षेत्रात उत्तम सुविधा मिळत असतानाही उत्तम डॉक्टर टिकत नाहीत. त्यांच्यावर असलेला दबाव आणि कामाचा ताण ही यामागील मुख्य कारणे आहेत. बहुतांश डॉक्टर हे अर्थकारण पाहून या क्षेत्रात येत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभाव हरपू लागला आहे, अशी खंतही डॉ. कुकडे यांनी यावेळी व्यक्त केली.
१९५६ साली मिशनरी रुग्णालयात मिरजमध्ये डॉक्टरच्या इंटर्नशिपसाठी पहिलीच तुकडी पाठवण्यात आली होती. त्यात डॉ. कुकडे यांचाही समावेश होता. आणीबाणीच्या काळात कुकडे यांनी तब्बल २१ महिन्यांचा कारावास भोगला होता. मात्र, या बंदिवासाची तुलना त्यांनी सुवर्णसंधीशी केली. बंदिवासाच्या वेळी वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांसोबत केलेल्या चर्चा, एका कैद्याला दिलेल्या एका दिवसाच्या जीवदानावर मिळवलेली विनावेतन डॉक्टरची जबाबदारी अशा अनेक आठवणींना त्यांनी या वेळी उजाळा दिला.
याप्रसंगी कुकडे यांनी लातूरच्या भूकंपापासून ते रुग्णालयाने केलेल्या समाजसेवी कार्याचा आलेख उमटवला. वैद्यकीय क्षेत्रात काम करताना वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा मानस होता. त्यासाठी महिनाभर दौराही केला. मात्र, दौर्याअंती सेवेपेक्षा वैद्यकीय महाविद्यालयातून अर्थकारण अधिक होईल असे वाटले. परिणामी, तो विचार मनातून काढून रुग्णालयाचे कामकाज वाढवण्यावर भर दिल्याचे सांगत कुकडे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील भ्रष्टाचार वाढत असल्याचे आपल्या भाषणात नमूद केले.
No comments:
Post a Comment