मुंबई : मुंबई धर्मादाय संस्थांच्या माध्यमातून चालवण्यात येणार्या रुग्णालयांकडून शर्तींचा भंग होत असल्यामुळे त्यांना देण्यात येणार्या सवलती ताबडतोब काढून घेण्यात याव्यात, अशी मागणी संजय दत्त यांनी मंगळवारी राज्य विधान परिषदेत केली.
औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे त्यांनी या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. धर्मादाय संस्थांच्या माध्यमातून चालवण्यात येणार्या रुग्णालयांना विक्रीकर, जकात, सीमा शुल्क अशा अनेक बाबतींत सवलत दिली जाते. या रुग्णालयांना दारिद्रय़रेषेखालील व्यक्तींसाठी १0 टक्के खाटा राखून ठेवणे बंधनकारक आहे, मात्र अनेक रुग्णालये सवलती घेतात; पण दारिद्रय़रेषेखालील व्यक्तींवर उपचार करत नाहीत. शासनाने याकडे लक्ष देऊन त्यांच्या सवलती त्वरित काढून घ्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
विरोधी पक्षनेते विनोद तावडे, डॉ. दीपक सावंत यांनी त्यांना पाठिंबा दिला. आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी या प्रकरणी त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले. उपसभापती वसंत डावखरे यांनी या विषयावर आपल्या दालनात बैठक घेण्याचे जाहीर केले.
No comments:
Post a Comment