मुंबई : राज्यातील दलितांवर होणार्या अत्याचारांत सातत्याने वाढ होत चालली आहे. ते रोखण्यासाठी दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा अधिक कठोर करण्याची गरज असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले म्हणाले. दलितांवर होणारे अत्याचार त्वरित रोखण्याच्या मागणीसाठी त्यांनी मंगळवारी गृहमंत्री आर.आर. पाटील यांची भेट घेतली. या संदर्भात लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे आश्वासन आर.आर. पाटील यांनी दिल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली. मंत्रालयात ते पत्रकारांशी बोलत होते.
भंडारा जिल्ह्यातील तीन अल्पवयीन मुलींचे हत्याकांड, पुणे जिल्ह्यातील दलित कार्यकर्ते चंद्रकांत गायकवाड यांचा खून तसेच नगर जिल्ह्यातील दलित महिलेवर अत्याचार करणार्यांना त्वरित अटक करून त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणीही रामदास आठवले यांनी या वेळी केली. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार विशेष न्यायालये त्वरित स्थापन करण्यात यावीत. यापूर्वी सहा न्यायालये स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली त्याचे काय झाले? असा सवालही त्यांनी या वेळी केला.
राज्यातील दुष्काळ सरकारनिर्मित
राज्यात हजारो कोटींच्या सिंचनाच्या योजना राबविण्यात येऊनदेखील पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दुष्काळ आहे. यावरूनच हा दुष्काळ सरकारनिर्मित असल्याचा आरोप रामदास आठवले यांनी केला. राज्यातील दुष्काळ निवारण्याच्या कामासाठी केंद्राने पाच हजार कोटी रुपये द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. राज्यातील दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून त्यांनी माजी खासदार आणि आमदार म्हणून मिळणारे ५२ हजार ५८५ रुपयांचे वेतनही त्यांनी देण्याचे जाहीर केले. राज्यातील दुष्काळाची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगून रामदास आठवले म्हणाले, डिसेंबर महिन्यातच पाण्याचे १ हजार ३00 टँकर सुरू होते, यावरूनच पाणीसाठय़ाचे नियोजन अयोग्य असल्याचे दिसून येते. यातून बोध घेऊन भविष्यात सरकारने पाणीसाठय़ाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. नवी दिल्लीत १३ मार्च रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून देशातील भूमिहिनांना पडिक जमीन दान करावी, अशी मागणी यावेळी करण्यात येणार असल्याचेही आठवले म्हणाले.
No comments:
Post a Comment