मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेल्या २७ शालेय वस्तूंऐवजी थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे टाकण्याचा प्रशासनाने घेतलेला निर्णय त्यातील जाचक अटींमुळे झोपडपट्टी आणि रस्त्यावर राहणार्या हजारो विद्यार्थ्यांना लाभापासून वंचित ठेवणारा असल्याने पालकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. फूटपाथ, मैदाने, रस्ते आदी ठिकाणी उघड्यावर राहणार्यांनी वास्तव्याच्या पुरावा आणि रेशन कार्ड कोठून आणायचे, हा यानिमित्ताने प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या सर्वभाषिक प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची गळती रोखत मुलांना शाळांकडे आकर्षित करणे तसेच शाळांची गुणवत्ता व दर्जा वाढविण्याच्या हेतूने चार वर्षांपूर्वी पालिका प्रशासनाने आपल्या शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, सॉक्स, स्कूल बॅग, वॉटर बॅग, जेवणाचा डबा, कंपास, रंगपेटी आदी २७ शैक्षणिक वस्तू मोफत देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मागील ४ वर्षांपासून या वस्तूंचे वाटप विलंबाने का होईना परंतु ते शाळांमधून केले जात होते; परंतु त्या वस्तूंचा दर्जा, त्यांची अवाजवी किंमत आणि मुख्यत: म्हणजे वितरणातील कमालीचा गोंधळ व अनियमितता लक्षात घेऊन पालिका आयुक्तांनी मुलांना २७ शालेय वस्तूंऐवजी गणवेश व बूट वगळता अन्य २४ वस्तूंचे पैसे थेट मुलांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेऊन येत्या शैक्षणिक वर्षापासून (२0१३-२0१४) करण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु त्यासाठी पात्रतेचे निकष ठरविताना निश्चित केलेल्या अटी नुसत्या जाचक नाहीत, तर हजारो मुलांना या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवणार्या असल्याने पालकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
विद्यार्थ्यांचे बँक खाते काढण्यासाठी त्या विद्यार्थ्याचे आधार कार्ड असावे, रेशन कार्ड की ज्यामध्ये विद्यार्थ्याचे नाव असले पाहिजे, राहण्याचा पुरावा म्हणून वीज बिल, पासपोर्ट व वाहन चालविण्याचा परवाना यापैकी एक, विद्यार्थ्याचे दोन फोटो, पालकांसमवेत एक एकत्रित फोटो या गोष्टी प्रत्येक विद्यार्थ्याकडे असणे आवश्यक आहे. या सर्व बाबींची पूर्तता करणार्या विद्यार्थ्यांचेच बँक खाते काढले जाणार आहे. परिणामी असेच विद्यार्थी वस्तूंऐवजी पैसे मिळण्यास पात्र ठरणार आहेत; परंतु पालिका शाळेत येणारी अनेक मुले रस्त्यावर, फूटपाथवर, मैदाने, मोकळ्य़ा जागा अशा मिळेल तेथे उघड्यावर राहणारी आहेत. अशी मुले रेशन कार्ड आणि राहण्याचा पुरावा कोठून आणणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
No comments:
Post a Comment