डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने पालिकेच्या जनसंपर्क विभागाचा भ्रष्टाचार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 March 2013

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने पालिकेच्या जनसंपर्क विभागाचा भ्रष्टाचार

पालिका आयुक्त कुंटे यांनी भ्रष्टाचाराची चौकशी करावी
मुंबई / अजेयकुमार जाधव (http://jpnnews.webs.com)
मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त, महापौर, स्थायी समिती अध्यक्ष यांच्याशी सतत जवळीक करणाऱ्या तसेच बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांनाच फक्त साहेब म्हणून ओळखतो असे सांगणाऱ्या विजय खबाले पाटील यांच्या जनसंपर्क विभागाने मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानेच भ्रष्टाचार केला असल्याचा भांडा फोड माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद पारगावकर यांनी केला आहे.

पालिकेद्वारे विविध कार्यक्रम आयोजित करताना जनसंपर्क विभागाकडून निमंत्रण पत्रिका छापून मान्यवर लोकांना वाटल्या जातात. या कामात जनसंपर्क अधिकारयाकडून व विभागाकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची माहिती मिळाल्याने माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद पारगावकर यांनी या संदर्भात माहिती मागवली असता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पत्रिकेत मोठा भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी मुंबई येथील चैत्यभूमी येथे येणाऱ्या लोकांना माहिती देण्यासाठी २४ पानांची पत्रिका दर वर्षी प्रसिद्ध केली जाते. पालिकेची स्वतःची प्रेस असल्याने येथे छपाई केली जाते परंतू डीटीपी मात्र बाहेरून केले जाते. मुंबई मध्ये कोठेही चांगल्या ठिकाणी डीटीपी डिझाईन केल्यास एका पानाला २५० ते ३०० रुपये घेतले जातात. यानूसार २४ पानांचे ६ ते ७ हजार रुपये होतात. 

डीटीपी साठी एका पानाला २५० रुपये यानूसार २४ पानांचे ६ हजार रुपये होत असताना जनसंपर्क विभागाने २००८ च्या पत्रिकेसाठी भाग्योदय ग्राफिक्सला प्रती पान १९०० रुपयांप्रमाणे २४ पानाचे दिनांक १२ डिसेंबर २००८ च्या बिलानुसार ४५६०० रुपये मंजूर करण्यात आले आहेत. २००९ च्या पत्रिकेसाठी भाग्योदय ग्राफिक्सला प्रती पान १८५० रुपयांप्रमाणे २४ पानाचे दिनांक १० जानेवारी २०१० नुसार ४४४०० रुपये मजूर केले असताना पुन्हा २००९च्या पत्रिकेसाठी भाग्योदय ग्राफिक्सला प्रती पान १९०० रुपयांप्रमाणे २४ पानाचे दिनांक १९ डिसेंबर २०११ मध्ये ४५६०० रुपये मंजूर केले आहेत. तर २०१२ च्या पत्रिकेसाठी प्रतिपान १०५० रुपयांप्रमाणे अशोक कॉम्प्यूग्राफिक्सला २५२०० रुपये मंजूर केले आहेत.

सन २००९ चे ४४४०० रुपयांचे बिल जानेवारी २०१० मध्ये मंजूर केले असताना पुन्हा डिसेंबर २०११ मध्ये ४५६०० रुपये का मंजूर करण्यात आले, एकाच वर्षाचे बिल दोन वेळा मंजूर का केले, एकाच वर्षीची दोन बिल मंजूर करताना जनसंपर्क विभागाचे अधिकारी कर्मचारी झोपले होते का असे प्रश्न पारगावकर यांनी उपस्थित केले असून पालिकेची स्वतःच्या मालकीची प्रिंटीग प्रेस असून या प्रेस मध्ये पालिकेच्या सर्व कामांची छपाई केली जाते. त्यामुळे पालिकेतील जनसंपर्क विभागाला व अधिकाऱ्याला भ्रष्टाचार करता येत नसल्याने डीटीपीचे काम बाहेरच्या संस्थाना देवून भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप पारगावकर यांनी केला आहे.

पालिकेच्या जनसंपर्क विभागाने व जनसंपर्क अधिकाऱ्याने केलेल्या या भ्रष्टाचाराची पालिका आयुक्त सिताराम कुंटे यांनी गंभीर दखल घेवून जनसंपर्क अधिकारी व विभागातील संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच डॉ. आंबेडकर यांच्या महापारीनिर्वाण दिनाच्या निमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रिकांमध्ये एवढा भ्रष्टाचार असेल तर पालिकेद्वारे आयोजित केलेल्या प्रत्येक कार्यक्रमाच्या पत्रिकेत किती भ्रष्टाचार असेल याची सखोल चौकशी करावी अशी मागणी पारगावकर यांनी केली आहे. 

माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद पारगावकर हे स्वताच भ्रष्टाचारी आहेत, तुम्ही सारख्या जाहिराती मागता त्या जाहिराती मागणे म्हणजे भ्रष्टाचार नाही का ? एक बिल दोन वेळा मंजूर करायला पालिकेचे आम्ही अधिकारी X XX (चुतीया) आहोत का ? तुम्हाला काय छापायचे ते छापा मला काही प्रतिक्रिया द्यायची नाही. 
विजय खबाले पाटील (जनसंपर्क अधिकारी) 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad