मुंबई : 'जर धारावीच्या झोपड्या तोडणार असेल तर टाटा, आम्हाला घ्यावा लागेल बाटा, जर इथल्या लोकांना खायला मिळाला नाही आटा, तर २0१४ सालच्या निवडणुकीत काँग्रेसवाल्यांचा काढून टाकू काटा,' असे म्हणत धारावीकरांना ५५0 चौ. फुटांचे घर मिळालेच पाहिजे, अशी आग्रही मागणी रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी नुकतीच केली आहे. रिपाइं, धारावी बचाव आंदोलन आणि टाटा पॉवर झोपडपट्टी बचाव समितीच्या वतीने नुकतेच धारावी येथे एका भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आठवले बोलत होते.
धारावीचा सेक्टर अंतर्गत विकास करताना कोट्यवधी रुपयांची जमीन विकासकांच्या घशात घालण्याचा डाव टाटा पॉवर आणि रेल्वे करत आहे. रहिवाशांना येथून मानखुर्द, चेंबूर, गोरेगाव अशा ठिकाणी पाठविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. धारावीकरांच्या डोळ्यात धूळफेक करून सरकारने बिल्डरधाजिर्णे वागू नये, असा इशारा या वेळी आठवले यांनी दिला. ४00चौ. फुटांचे घर मोफतच मिळाले पाहिजे, विकास कोणाकडून करायचा तो करा मात्र निर्णय लवकर घ्या, अशी मागणी या वेळी आठवले यांनी केली. या वेळी धारावी बचाव आंदोलनाबरोबर टाटा पॉवर कृती समितीचे सर्व पदाधिकारी आणि शिवसेना, भाजपा आणि रिपाइं, सपा, बसपा नेते या वेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment