मुंबई : सरकारने अणुऊर्जा प्रकल्पासाठी कोटय़वधीचे पॅकेज दिले तरी ते नको आहे. त्यामुळे 'पॅकेज नको, अणुऊर्जा प्रकल्प हटवा' असे सांगत मार्च महिन्यात आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचे जैतापूर पंचक्रोशी संघर्ष समिती आणि जनहित सेवा समितीने गुरुवारी पत्रकार संघात जाहीर केले.
जैतापूर प्रकल्पग्रस्तांना 80 पट वाढीव मोबदला देण्याचा निर्णय राज्यपातळीवर घेण्यात आला आहे. यामध्ये प्रतिहेक्टरी 22 लाख 50 हजार सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. मात्र जमिनीसाठी कोटय़वधी रुपये दिले तरी भूमिका बदलणार नाही, अशी भूमिका पंचक्रोशीतील गावकर्यांनी आणि राजकीय पक्षांनी घेतली आहे. जमिनीला चांगला भाव मिळावा म्हणून आम्ही आंदोलन करत नाही. या अणुऊर्जा प्रकल्पामुळे जीवसृष्टी आणि पर्यावरणावर परिणाम होणार आहे, म्हणून या प्रकल्पास नकार आहे.
गेल्या काही काळात अनेक देशांनी अणुऊर्जा प्रकल्पास विरोध दर्शवला आहे. मात्र भारतात हा प्रकल्प राबवताना जनतेच्या आणि पर्यावरणाच्या घटकाचा विचार करण्यात आला नाही, असा आरोप समितीचे पदाधिकारी प्रवीण गवाणकर यांनी केला आहे. अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांना भरघोस मोबदला देण्याच्या निर्णयानंतर गुरुवारी भारत दौर्यावर फ्रान्सचे अध्यक्ष आले आहेत. त्यामुळे फ्रान्समध्ये विरोध झालेला अणुऊर्जा प्रकल्प भारतात थाटण्याचा आणि फ्रान्सच्या अध्यक्षांना खूश करण्याचा केंद्र सरकारचा लाजीरवाणा प्रयत्न असल्याचा आरोप या वेळी समितीचे पदाधिकारी शैलेश वाघमारे यांनी केला आहे.
No comments:
Post a Comment