दादर चौपाटी सुशोभिकरणामुळे महापौर बंगल्यास धोका - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 February 2013

दादर चौपाटी सुशोभिकरणामुळे महापौर बंगल्यास धोका

मुंबई : दादर चौपाटीवर सुरू असलेल्या सुशोभिकरणावरून महापौर सुनील प्रभू यांनी मनसेचे आ. नितीन सरदेसाई यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. सरदेसाई यांच्या आमदार निधीतून होत असलेल्या सुशोभिकरणाच्या कामामुळे बंगल्याला धोका निर्माण होत असल्याचा दावा करताना महापौर सुनील प्रभू यांनी स्थानिक आमदार जनतेच्या सेवेसाठी झटत असल्याचा कांगावा करत असल्याचा आरोप केला आहे.

चौपाटीवर सुशोभिकरणाच्या कामात वापरण्यात येणार्‍या भव्य टेट्रा पॉट्समुळे समुद्रकिनार्‍यावरून महापौर बंगल्यात कोणीही प्रवेश करू शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या सुशोभिकरणास स्थानिक कोळी बांधवांसह पर्यावरणतज्ज्ञांचा विरोध आहे. एमएमआरडीए आणि महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या अधिकार्‍यांनी या कामादरम्यान मनपा अधिकार्‍यांशी चर्चा करणे आवश्यक होते. मात्र त्यांनी पालिका अधिकार्‍यांशी संपर्क साधला नाही. सुशोभिकरणावरून तक्रारी आल्यानंतर आपण पालिका अधिकार्‍यांना घटनास्थळाची पाहणी करण्यास सांगितले आहे. सुशोभिकरणामुळे जनतेला त्रास होत असून समुद्राची मोठय़ा प्रमाणावर धूप होत असल्याचे महापौर प्रभू यांनी म्हटले आहे.

असे होणार सुशोभिकरण
एमएमआरडीए आणि महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डामार्फत माहीम बंदर ते चैत्यभूमीपर्यंतच्या सागरीकिनार्‍यावर धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्याची योजना आहे.योजनेच्या पहिल्या टप्प्यात हिंदुजा हॉस्पिटल ते दादर चैत्यभूमीदरम्यानच्या २२६ मीटर सागरी क्षेत्रात दगड आणि टेट्रा पॅक टाकण्यास सुरुवात झाली आहे. सुशोभिकरणामध्ये चौपाटीवर जॉगिंग ट्रॅक उभारण्यात येणार आहे. दुसर्‍या टप्प्यात समुद्रात जिओट्यूब टाकण्यात येणार आहे. किनार्‍यापासून एक किमीच्या अंतरापर्यंत वाळू संवर्धनाचा नवा प्रयोग हाती घेण्यात येणार आहे. समुद्रकिनार्‍यावर बंधारा बांधण्यात आल्यानंतर परिसरातील इमारतींना लाटांच्या धडका बसणार नाहीत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad