स्त्री जन्माचे स्वागत करा - गायकवाड - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 March 2013

स्त्री जन्माचे स्वागत करा - गायकवाड


मुंबई : स्त्रीभ्रूण हत्येला आळा घालणे, महिलांचा योग्य सन्मान राखणे आणि एकूणच महिलांचा विकास साधणे यासाठी सर्वंकष प्रयत्नांची गरज आहे. त्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल म्हणून आपण सर्वांनीच स्त्री जन्माचे स्वागत करण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले. महिला आणि बालकल्याण विकासमंत्री प्रा. वर्षा गायकवाड या गुरुवारी जनता दरबार कार्यक्रमात बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या की, आजच केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर झालेला असून त्यात अनेकविध समाजोपयोगी योजनांचा समावेश आहे. महिलांसाठी स्वतंत्र बँक स्थापन करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे महिला, महिला संस्था, महिला संघटना, महिला बचत गट इत्यादींच्या आर्थिक विकासासाठी निधी उभारण्याचा प्रभावी मार्ग उपलब्ध झाल्याने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि वित्तमंत्री यांचे अभिनंदन करणे अगत्याचे असल्याचे गायकवाड या वेळी म्हणाल्या. दरम्यान, येत्या ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नवीन महिला धोरणाच्या प्रारूपाचे उद््घाटन करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad