महानायकच्या लढायीचा विजय
मुंबई महानगर पालिकेमध्ये मागासवर्गीय उमेदवारांची भरती होत नसल्याचे निदर्शनास आल्यावर माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद पारगावकर यांच्याकडून माहिती अधिकारात माहिती मागवून पालिकेमध्ये मागासवर्गीयांची १९ हजार रिक्त पदे असल्याचे दैनिक जनतेचा महानायकचा मुंबई महानगर पालिके मधील पत्रकार म्हणून सर्वात प्रथम उघड केले होते. पालिकेत १९ हजार मागासवर्गीयांची पदे रिक्त असल्याचे उघड केल्यानंतर गप्प न बसता या विषयावर गेले वर्षभर सतत बातम्या व लेख प्रसिद्ध केल्याने पालिका सभागृहाला मागासवर्गीयांची १९ हजार रिक्त पदे भरण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. हा तमाम मागासवर्गीयांचा व दैनिक जनतेचा महानायाक्ने सुरु केलेल्या लढायीचा विजय आहे.
मुंबई महानगर पालिकेमध्ये अ ब क ड अशा चार वर्गामध्ये जवळपास १ लाख २० हजार कर्मचारी काम करत आहेत. यापैकी सहप्रमुख कर्मचारी अधिकारी यांनी १५ डिसेंबर २०११ रोजी माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद पारगावकर यांना दिलेल्या माहितीनुसार मागासवर्गीयांचा पालिकेमध्ये १९ हजार पदांचा अनुशेष बाकी असल्याचे कळविले होते.
पालिकेने दिलेल्या माहितीत ३० जून २०११ रोजीच्या आकडेवारी नुसार पालिकेच्या अ ब क ड अशा चार वर्गामध्ये सरळसेवा भर्तीद्वारे ८६०४४ पदे मंजूर आहेत त्यापैकी ६५६९८ पदे भरली असून २०३४६ पदे रिक्त आहेत तर एस सी ची २११७, एस टी ची ३१०३, विजे (अ) ची १२४३, एन टी (ब) ची ९६४, एन टी (सी )ची १३७०, एन टी (डी )ची ९८२, एस बी सी ची ८६४, ओ बी सी ची ४१६६ अश्या एकूण १४८३९ पदांचा अनुशेष बाकी असल्याचे म्हटले आहे.
तर पदोन्नतीद्वारे २४१०५ पदे मंजूर आहेत त्यापैकी १४८४४ पदे भरली असून ९२६१ पदे रिक्त आहेत. एस सी ची ९१० , एस टी ची १०६९ , विजे (अ) ची ४२७ , एन टी (ब) ची ३२६ , एन टी (सी )ची ५३९ , एन टी (डी )ची ३५८ एस बी सी ची ३४३ अश्या एकूण ३९७२ पदांचा अनुशेष बाकी असल्याचे म्हटले आहे.विशेष म्हणजे सरळ सेवा व पदोन्नतीद्वारे मागासवर्गीयांचा जवळपास १९ हजार पदांचा अनुशेष बाकी असताना खुल्या वर्गातील कोणत्याही पदांचा अनुशेष बाकी नसल्याचे म्हटले आहे.
पालिकेतील अपक्षांचे गटनेते मनोज संसारे यांनी मागासवर्गीयांची १९ हजार पदे रिक्त असून हि पदे त्वरित भरावीत अशी मागणी पालिका सभागृहात केली होती. शुक्रवारी ८ फेब्रुवारी २०१३ रोजी पालिकेचे सभागृह चालू असताना पालिकेतील भाजपचे नगरसेवक विनोद शेलार यांनी पालिकेत २८ हजार पदे रिक्त असून त्यापैकी १९ हजार पदे हि फक्त मागासवर्गीयांची आहेत. पालिकेत हि पदे भरली जात नसल्यामुळे पालिकेच्या इतर कर्मचाऱ्यांवर ताण पडत असून पालिका आपली सेवा नागरिकांना योग्य प्रकारे पोहोचवू शकत नाही. यामुळे हि रिक्त पदे त्वरित भरावीत अशी मागणी हरकतीच्या मुद्याद्वारे केली.
सदर मागणी करताना शेलार यांनी मागासवर्गीय उमेदवार मिळत नसल्याने हि पदे भरली जात नाहीत असे पालिका प्रशासन म्हणत असेल तर जो पर्यंत मागासवर्गीय उमेदवार मिळत नाहीत तो पर्यंत इतर उमेदवार भरून पालिकेने लोकांना चांगली सेवा देण्याचे काम करावे असे आवाहन केले. यावेळी सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी आपले अनुभव सांगताना पदे भरली जात नसल्याने पालिकेच्या विविध विभागात कसे आणि काय प्रकार घडतात याचा पाढाच वाचून दाखवला. तर समाजवादी पक्षाचे नगरसेवक याकुब मेमन यांनी मागासवर्गीय उमेदवार मिळत नाहीत त्यांच्या ऐवजी इतर उमेदवारांची भरती केल्यास ते नंतर या पदावर आपला हक्क सांगतात यामुळे या जागांवर इतर उमेदवारांची कायमस्वरूपी इतर समाजातील लोकांची भरती करावी अशी मागणी केली आहे.
पालिका सभागृहात भरतीच्या विषयावर चर्चा सुरु असताना मागासवर्गीय असलेले व भारिप बहुजन महासंघाकडून चेंबूर विभागातून निवडून आलेले अरुण कांबळे यांनी तर कहर करत कोणतीही माहिती नसताना अनुसूचित जातीची पदेच रिक्त नसल्याचे सांगून आपल्या अकलेचे तारे तोडले. यावेळी बोलताना इतर मागासवर्गीय जातीची पदे रिक्त असून या समाजातील लोक जास्त शिक्षित नसल्याने भरतीमधील नियम शिथिल करून इतर जातीमधील उमेदवारांना रिक्त पदांवर सामावून घ्यावे अशी मागणी केली. तर काही नगरसेवकांनी पालिकेने भरती संदर्भात परीक्षा घेतली होती. या परीक्षेत कित्तेक उमेदवारांना शंभर पैकी शंभर गुण मिळाले असून त्यांची वय बाद होणार असल्याने अशा उमेदवारांना या भरती प्रक्रियेत प्राधान्य द्यावे अशी मागणी केली आहे.
पालिका सभागृहात हरकतीच्या मुद्यावर झालेली चर्चा, नगरसेवकांच्या भावनांचा व मागण्यांचा विचार करता महापौर सुनील प्रभू यांनी शंभर पैकी शंभर गुण मिळालेल्यांना भरतीमध्ये प्राध्यान्य द्यावे त्याबरोबरच पालिकेतील रिक्त पदे भरण्याची कारवाही त्वरित सुरु करावी असे निर्देश दिले आहेत. महापौर सुनील प्रभू यांनी दिलेल्या निर्देशानंतर पालिका प्रशासन लवकरच हि पदे भरण्याची कारवाही करेल अशी अपेक्षा आहे.
पालिकेमधील तत्कालीन आयुक्त सुबोध कुमार, अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी व पालिकेतील जातीवादी अधिकाऱ्यांनी केंद्रीय एस.सी.एस.टी. आयोग पालिकेच्या भेटीला आला असता पालिकेमध्ये एस.सी.एस.टी.ची व मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची कोणतीच पदे रिक्त नसल्याचे सांगून एस.सी.एस.टी. आयोगाची दिशाभूल केली होती. आता पालिका सभागृहानेच २८ हजार पदे रिक्त असून त्यापैकी मागासवर्गीयांची १९ हजार पदे रिक्त असल्याचे मान्य केले आहे. यामुळे एस.सी.एस.टी. आयोगाला खोटे वक्तव्य करणारे सुबोध कुमार, मोहन अडतानी व जातीवादी पालिका प्रशासन उघडे पडले आहे.
मागासवर्गीय उमेदवार मोठ्या प्रमाणात आहेत. या मागासवर्गीय उमेदवारांना पालिकेची नोकरी मिळावी म्हणून मागासवर्गीय समाजातील सर्व कर्मचारी, अधिकारी, संस्था, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या तारणहार म्हणवणारे युनियनचे नेते, मागासवर्गीय असलेले नगरसेवक यांनी मागासवर्गीयांची भरती प्रक्रिया लवकर कशी सुरु होईल व या भरती द्वारे मागासवर्गीयांचीच पदे कशी भरली जातील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३
मुंबई अध्यक्ष -
जर्नालीस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र
No comments:
Post a Comment