मुंबई : प्रभाग समितीने सुचवलेल्या भांडवली स्वरूपाच्या रस्ते, पदपथ, रस्त्याच्या बाजूच्या पर्जन्य जलवाहिन्या व सुशोभिकरण इत्यादी विकासकामांसाठी सन 2012-13 अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीप्रमाणे प्रत्येक नगरसेवकास प्रभाग समितीच्या माध्यमातून मिळणार्या 40 लाखांच्या विकास निधीतून ही कामे करण्यात येणार आहेत, असे आदेश प्रशासनाकडून एका परिपत्रकानुसार दिले आहेत.
या तरतुदीचा विनियोग नागरी पायाभूत सुविधा पुरवणे किं वा विद्यमान पायाभूत सेवासुविधांची दर्जोन्नती करणे या प्रयोजनार्थच करणे अपेक्षित आहे. या तरतुदीमधून लहान रस्ते, पालिका क्षेत्रातील गलिच्छ वस्त्यांमध्ये सार्वजनिक सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी आहे, अशा ठिकाणी सार्वजनिक उपयोगाकरिता स्नानगृहे, संडास, पायवाटा, सार्वजनिक स्वरूपाचा पाणीपुरवठा व दिवाबत्ती अशा स्वरूपाची कामे या निधीतून केली जाणार आहेत. त्याचप्रमाणे बगिच्यामध्ये खेळाचे साहित्य बसवणे,पालिका मालमत्तेवर अतिक्रमण न होण्याच्या दृष्टीने कम्पाऊंड बांधणे, स्मशानभूमीत शेड्स बांधणे, अशा सुविधा पुरवण्यात येणार आहेत.
विजेच्या खर्चात बचत होण्याच्या दृष्टीने सौरऊर्जेवर चालणारे दिवे बसवणे, पालिका वसाहतीत नागरी सुविधा पुरवणे तसेच विभाग पातळीवर नागरी सेवा पुरवणे किंवा विद्यमान पायाभूत सेवांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने पालिका आयुक्तांच्या मान्यतेने घेण्यात येणारी इतर अन्य कामेही या निधीतून केली जाणार आहेत. या निधीची विनियोग फक्त भांडवली स्वरूपाची कामे करावयाची असल्याने या निधीतून दुरुस्ती किंवा परीक्षणाची कामे हाती घेण्यात येऊ नयेत, अशा सूचना पालिका प्रशासनाकडून एका परिपत्राकाद्वारे करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment