मुंबई : ऑस्ट्रेलिया दौर्यातील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी निवड झालेला फिरकीपटू हरभजन सिंग सोमवारी मनपा मुख्यालयात आला होता. कोणताही खेळाडू आणि क्रिकेटपटू मनपा मुख्यालयात येण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी. म्हणून मनपातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधींच्या भुवया उंचावल्या होत्या.मात्र आयुक्त सीताराम कुंटे यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर हरभजन सिंगने आपल्या भेटीचे गुपित फोडले. अंधेरी येथे क्रिकेट अकादमी सुरू करण्यासंबंधी ही भेट असल्याची माहिती देत हरभजन सिंगने सर्व चर्चाना विराम दिला.
पंजाबमध्ये हरभजनने क्रिकेट अकादमी सुरू केली आहे. त्याच धर्तीवर मुंबईतही अकादमी सुरू करण्याची त्याची इच्छा आहे. हरभजनने त्यासाठी अंधेरी स्पोर्ट्स क्लबचा पर्याय निवडला आहे. आपली क्रिकेट अकादमी अंधेरी स्पोर्ट्स क्लबमध्ये सुरू करण्यासंबंधी त्याने या वेळी आयुक्तांबरोबर चर्चा केली. या अकादमीत मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे, तर खाजगी आणि विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे त्याने सांगितले. यासंबंधीचा प्रस्ताव हरभजनने सादर केल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती पालिकेतील अधिकार्यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment