मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील शाळांमधील विद्यार्थ्यांना सुगंधीत दुधाऐवजी शेंगदाणा चिक्की, राजगिरा लाडू इत्यादी पौष्टिक पदार्थ आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याने देण्यात यावे, अशी मागणी शिक्षण समिती सभेत एकमताने करण्यात आल्याने आणि या सूचनेस अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी अनुकूलता दर्शविली असल्याने या वर्षीपासून विद्यार्थ्यांना सुगंधी दूध बंद करून इतर पौष्टिक पदार्थ दिले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. शिक्षण समिती अध्यक्ष विठ्ठल खरटमोल यांनी यासंदर्भात पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना पत्र पाठवून शिक्षण समितीत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने कारवाई करण्याची विनंती केली आहे.
शिक्षण खात्याच्या 'ई' अर्थसंकल्पातील अंदाजपत्रकावर 8, 11, व 12 फेब्रुवारी 2013 रोजी झालेल्या सभेतील चर्चेनुसार शालेय विद्यार्थ्यांना सुगंधी दुधाचा पुरवठा करण्याऐवजी शेंगदाणा चिक्की, राजगिरा लाडू इत्यादी पौष्टिक पदार्थ आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याने देण्यात यावे, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांकडून केली गेली. तसेच पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना 27 शालोपयोगी वस्तूंचा पुरवठा करण्याऐवजी रोख रक्कम देण्यास या बैठकीत विरोध करण्यात आला होता. या दोन महत्त्वाच्या मुद्दय़ांवर अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सुगंधीत दुधाऐवजी इतर पौष्टिक पदार्थ देण्याबाबत अनुकूलता दर्शविली असल्याचे खरटमोल यांनी सांगितले. या अनुषंगाने खरटमोल यांनी कार्यवाही करण्याबाबत पालिका आयुक्तांना पत्राद्वारे विनंती केली असून पुढील शालान्त वर्षी पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना सुगंधीत दुधाऐवजी चिक्की, लाडू इत्यादी पौष्टिक पदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.
No comments:
Post a Comment