२0 आणि २१ फेब्रुवारी रोजी पुकारण्यात आलेल्या भारत बंदपूर्वी कामगार नेते शरद राव आणि शिवसेनाप्रणीत भारतीय कामगार सेना यांचे एकमत झाले नाही. त्यामुळे दोन्ही युनियनचे नेते एकमेकांवर चिखलफेक करत होते. यातच शरद राव यांनी उद्धव ठाकरेंचा 'कागदी वाघ' असा उल्लेख केल्याने शिवसैनिक दुखावले होते. यातूनच गुरुवारी सायंकाळी गोरेगाव (प.), एम. जी. रोड चर्चच्या समोर असलेल्या हिंद मजदूर महासभा आणि अँटो रिक्षा मेन्स युनियनच्या कार्यालयात रिक्षातून आलेल्या तीन शिवसैनिकांनी घुसून कार्यालयाचा काचेचा दरवाजा व खाली असलेल्या गाडीची सोबत आणलेल्या बॅटने तोडफोड केली.
इमारतीच्या वरच्या माळय़ावर असलेली कार्यालये बंद असल्याने हल्लेखोरांना वरती जाता आले नाही. खाली बसलेल्या युनियनच्या कार्यकर्त्यांनी हल्लेखोरांचा पाठलाग केला, मात्र ते हाती लागले नाहीत. गोरेगाव पोलिसांत या प्रकरणी अज्ञात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हल्लेखोर शिवसैनिकच असतील असे सांगता येत नाही, अशी प्रतिक्रिया गोरेगाव विभागाचे एसीपी खैरमोडे यांनी व्यक्त केली आहे.
No comments:
Post a Comment