मुंबई : मुंबईतील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन मुंबई शहरवासीयांना योग्य पद्धतीने पाणीपुरवठा सुविधा पुरवण्यासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियमामध्ये आवश्यक ती दुरुस्ती करून 'पाणीपुरवठा समिती' स्थापन करण्यात यावी, अशी मागणी मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.
मुंबई शहर महाराष्ट्राची राजधानी असून देशाची आर्थिक राजधानी असलेले आंतरराष्ट्रीय शहर आहे. या शहरात अनेक व्यवसाय, उद्योगांची कार्यालये, पंचतारांकित हॉटेल्स असून त्याचबरोबर मोठय़ा प्रमाणात झोपडपट्टय़ाही आहेत. शहरातील उद्योग, व्यवसायांना तसेच रहिवाशांना पाण्याचा पुरवठा करणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र पाणीपुरवठय़ाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. पाणीपुरवठा सुविधांसाठी आवश्यक त्या प्रमाणामध्ये अर्थसंकल्पात निधीची तरतूद करूनही योग्य नियोजनाअभावी शहरवासीयांना अपुर्या पाणीपुरवठय़ामुळे त्रास सहन करावा लागत आहे.
महानगरपालिका अधिनियमाद्वारे या कामाचे नियोजन आणि मंजुरी देणार्या प्राधिकरणाकडेच पाणीपुरवठय़ासोबत मलनि:सारण, रस्ते, पर्जन्य जलवाहिन्या, आरोग्य इत्यादी महत्त्वाची कामेही सोपवण्यात आली आहेत. यामुळे पाणीपुरवठा सुविधेकडे दुर्लक्ष होत आहे. पाण्यासाठी नवीन स्नेतांचा विकास करण्याबरोबरच जलवाहिन्या टाकणे, त्यांची दुरुस्ती करणे इत्यादी महत्त्वाच्या कामांचे नियोजन करणे, मंजुरी देणे, अंमलबजावणी करणे, यासाठी दिल्ली, चेन्नई, बंगळुरू शहरांप्रमाणे मुंबई शहरासाठी स्वतंत्र जलप्राधिकरण असण्याची आवश्यकता निर्माण झाली असल्याचे लांडे यांनी सांगितले
No comments:
Post a Comment