डॉ. विजयकुमार गावीत यांच्या संपत्तीच्या चौकशीचे आदेश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 February 2013

डॉ. विजयकुमार गावीत यांच्या संपत्तीच्या चौकशीचे आदेश

मुंबई : राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांच्यासह कुटुंबीयांच्या संपत्तीची चौकशी करून दोन आठवड्यांच्या आत त्याबाबतचा अहवाल सादर करावा, असा आदेश उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाने दिला. याबाबत विष्णू राधाजी मुसळे यांच्यासह तिघांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना शुक्रवारी हे आदेश देण्यात आलेत. 

याबाबत माहिती अशी की, डॉ. विजयकुमार गावीत यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता असून त्यांच्यासह कुटुंबीयांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका विष्णू राधाजी मुसळे, शिवाजी अभिमन रोंदळ आणि किसन बाबुराव चौरे यांनी दाखल केली आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव, गृह मंत्रालयाचे मुख्य सचिव, अतिरिक्त सचिव, पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त, मुंबई, डायरेक्टर ऑफ एनफोर्समेंट, कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स, डॉ. विजयकुमार गावीत, कुमुदिनी विजयकुमार गावीत आणि शरद कृष्णराव गावीत यांना यात प्रतिवादी करण्यात आले आहे. 

डॉ. गावीत आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे निवडणुकांच्या काळात शपथपत्रात दाखविण्यात आलेली मालमत्ता त्यानंतर त्यात झपाट्याने झालेली वाढ लक्षात घेता त्यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता जमा झाल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांच्यासह संपूर्ण कुटुंबीयांची चौकशी व्हावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली. याचिकाकर्त्यांचे वकील अँड़ विजय वारुंजीकर यांनी शुक्रवारी न्यायालयात आपली बाजू मांडून चौकशीबाबत आदेश द्यावेत, म्हणून मागणी केली. 

त्यावर न्या. खानविलकर आणि न्या. ताथेड यांनी डॉ. गावीत यांच्यासह मालमत्तेची चौकशी करून दोन आठवड्यांच्या आत याचा अहवाल सादर करावा, असे आदेश दिलेत. तशा नोटिसा डॉ. विजयकुमार गावीत यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना आणि शासनाच्या वरील विभागांना काढण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad