मुंबई : मुंबई शहरात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे दिसून येते. महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने महिलांनाच सक्षम बनवण्याची गरज आहे. याचा विचार करता पालिका शाळांतील विद्यार्थिनींना स्वसंरक्षण करता यावे, यासाठी शाळेच्या वेळेत शारीरिक शिक्षण या विषयांतर्गत ज्युडो, कराटे आणि तत्सम प्रकारचे विशेष प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी पालिकेतील नगरसेविका वर्षा टेंबवलकर तसेच राजश्री पालांडे यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.
दिल्लीतील सामूहिक अत्याचाराच्या घटनांनंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून अत्याचाराविरोधात लढण्यासाठी सर्वत्र चळवळी सुरू झाल्या आहेत. अनेक सामाजिक संस्था महिला, मुलींना ज्युडो कराटेचे प्रशिक्षण देत आहेत. या संस्था पालिका शाळांमधूनही प्रशिक्षण देण्यास तयार असतात. मुंबई पोलिसांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी कितीही उपाययोजना आखल्या तरी पोलीस बळ अपुरे पडत आहे. त्यामुळे महिलांना स्वत:च्या रक्षणासाठी सक्षम करणे अत्यंत गरजेचे आहे. ही वस्तुस्थिती पाहता ज्युडो कराटेचे प्रशिक्षण देणे आधुनिक युगात आवश्यक आहे. याकरिता पालिका शाळेतील विद्यार्थिनींना सक्षम करण्यासाठी शालेय अभ्यासक्रमामध्ये शाळेच्या वेळेत शारीरिक शिक्षण या विषयांतर्गत किंवा सुट्टीच्या दिवशी ज्युडो, कराटेचे विशेष प्रशिक्षण देण्यात यावे आणि हे प्रशिक्षण बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी पालिकेतील नगरसेविकांनी केली आहे.
No comments:
Post a Comment