भारताबाहेर बाबासाहेबांचा पहिलाच पूर्णाकृती पुतळा
माणसाला माणूस म्हणून माणूस जगायला अधिकार मिळवून देणारे, थोर समाजसेवक, बहार्तीया राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा श्रीलंकेत उभा राहणार आहे. बाबासाहेबांचा पुतळा उभारावा या साठी इंडो-श्रीलंका बुध्दीस्ट नेटवर्क संघटना गेले कित्तेक वर्षे प्रयत्न करत होती. भारतीय भिक्कुंचे एक शिष्ट मंडळ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून त्यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती महेंद्र राजपक्षे यांची भेट घेतली असता राष्ट्रपतींनी बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यास परवानगी दिली असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले आहे.
भारतीय राज्य घटनेचे जनक म्हणून, दलितांचे उध्दारकरते म्हणून भारतात अनेक शाळा, महाविद्यालये, सरकारी संस्था व कार्यालयांना बाबासाहेबांचे नाव देण्यात आले आहे. भारतात सर्वात जास्त संख्येने बाबासाहेबांचे पुतळे आहेत. भारताबाहेर बाबासाहेबांच्या नावाने अनेक अध्यासन केंद्रे सुरु झाली असली तरी तेथे बाबासाहेबांचे अर्धपुतळे उभारण्यात आले असून एकही पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला नाही.
श्रीलंकेची उप राजधानी असलेल्या क्यांडी येथे शुक्रवारी रामदास आठवले, अविनाश कांबळे, बबन कांबळे व भिक्कू संघाच्या शिष्टमंडळा बरोबर राजपक्षे यांनी चर्चा केली. श्रीलंकेचे राष्ट्रपती राजपक्षे यांनी बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यास परवानगी दिल्याने इंडो-श्रीलंका बुध्दीस्ट नेटवर्क व भिक्कू संघाच्या प्रयत्नांना यश आले आहे.
बाबासाहेब आंबेडकर यांनी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली होती त्या विद्यापीठाच्या ग्रंथालयात बाबासाहेबांचा अर्धपुतळा आहे. इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या आवारातही बाबासाहेबांचा अर्धपुतळा आहे. त्यानंतर आता श्रीलंकेत बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहत आहे.
श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबो शहरातच बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. बाबासाहेबांच्या या पूर्णाकृती पुतळ्याचा संपूर्ण खर्च श्रीलंका सरकार करणार आहे. कोलंबो येथील टाऊन हॉल परिसर प्रतिष्ठित म्हणून ओळखला जातो. या ठिकाणीच महापौरांचे कार्यालय सुद्धा असून याठिकाणीच बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. श्रीलंकेतील बौद्ध धर्माचे महान प्रचारक अनागरिक धर्मपाल यांच्या पुतळ्या शेजारीच बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यात येणार आहे.
बाबासाहेबांच्या धम्मकार्याची दखल
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखन, नागपूरच्या दिक्षाभूमिवरील ऐतिहासिक धर्मांतर तसेच भारतीय बौद्ध महासभेची स्थापना या बाबासाहेबांच्या धम्मकार्याची दखल घेवून श्रीलंका सरकारने हा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
No comments:
Post a Comment