मुंबई धावली......... - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 February 2013

मुंबई धावली.........

दोन दिवसांचा भारत बंद पुकारण्यात आला आहे. या संपामध्ये देशातील 11 प्रमुख कामगार संघटनांनी सहभाग घेतला आहे; परंतु मुंबईतील रिक्षा-टॅक्सी, बेस्ट, एसटी कामगार संघटना या संपात प्रत्यक्ष सहभागी झाल्या नसल्यामुळे शहरातील वाहतूक सुरळीत सुरू होती. मध्य आणि पश्चिम रेल्वेतील युनियनने संपाला नैतिक पाठिंबा दर्शवला असल्यामुळे लोकल सेवा सुरळीत सुरू होती. त्यामुळे संपाचा परिणाम मुंबईमध्ये प्रामुख्याने जाणवला नाही.

पालिकेचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरळीत
मुंबई : कामगार नेते शरद राव यांनी केवळ औद्योगिक क्षेत्रात संप पुकारल्याने मुंबई महानगरपालिकेत बंदचा कोणताही परिणाम जाणवला नाही. बुधवारी पालिका मुख्यालयात नेहमीप्रमाणे सुरळीत कामकाज सुरू होते. केंद्र सरकारकडून कामगारविरोधी धोरण अवलंबिले जात असल्याच्या निषेधार्थ देशातील प्रमुख 11 कामगार संघटनांकडून 20 व 21 फेब्रुवारीला बंद पुकारण्यात आला आहे, मात्र शिवसेना तसेच शरद राव यांच्या संघटनेने केवळ औद्योगिक क्षेत्रात बंद पुकारला असल्याने मुंबईतील सर्व जनजीवन सुरळीत होते. मुंबई पालिकेतही शरद राव आणि शिवसेना युनियनचे प्राबल्य असल्याने आणि या बंदमध्ये औद्योगिक क्षेत्राव्यतिरिक्त कामगार सहभागी न झाल्याने पालिकेचे कामकाजही नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू होते. मुंबई महानगरपालिकेच्या 24 वॉर्डामध्ये एकूण 31 हजार 593 कर्मचार्‍यांपैकी 29 हजार 336 कर्मचारी उपस्थित होते, तर 2257 कर्मचारी विविध कारणांमुळे गैरहजर होते. पालिकेच्या एकूण 9 महत्त्वाच्या रुग्णालयांतील एकूण 10 हजार 492 कर्मचार्‍यांपैकी 9 हजार 912 कर्मचारी उपस्थित होते, तर 580 कर्मचारी गैरहजर होते. पालिकेच्या इतर विविध विभागातील 9 हजार 95 कर्मचार्‍यांपैकी 8 हजार 799 कर्मचारी उपस्थित होते, तर 296 कर्मचारी अनुपस्थित होते.

दोन बसेसवर दगडफेक
मुंबई : भारत बंदमध्ये मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुरळीत धावली असली तरी बेस्टच्या दोन बसेसवर पवई लेक आणि रिलायन्स एनर्जीच्या ऑफिससमोर करण्यात आलेल्या दगडफेकीमुळे बसेसच्या काचा फुटल्या. या दगडफेकीमध्ये कोणताही प्रवासी जखमी झाला नसला तरी बेस्टचे मात्र आर्थिक नुकसान झाले आहे. भारत बंदमध्ये बेस्टमधील कामगार युनियन सहभागी नव्हती. बेस्टच्या बसेस नेहमीप्रमाणे रस्त्यावर धावत होत्या. पवई लेक येथे बस क्रमांक 422 आणि रिलायन्स एनर्जीच्या ऑफिससमोर बस क्रमांक 186 वर दगडफेक करण्यात आली होती. या दगडफेकीमुळे बस क्रमांक 422 ची एक काच तर बस क्रमांक 186 च्या दोन काचा फुटल्या. या दगडफेकीमध्ये कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नसली तरी बेस्टचे आर्थिक नुकसान झाले.


50 कोटींचे नुकसानमालवाहतुकीला फटका
मुंबई : केंद्र सरकारच्या क ामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ भारतातील सर्व केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपात मुंबई, जेएनपीटी, विशाखापट्टणम, मँगलोर, परादीप, तुतीकोरीन या प्रमुख बंदरांतील बंदर व गोदी कामगारांनी सहभाग घेतल्यामुळे आयात-निर्यातीचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. या संपामुळे मुंबई बंदराचे एका दिवसाचे सुमारे 4 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, तर इतर सर्व बंदरांचे 50 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मुंबई बंदरात हिंद मजदूर सभेशी संलग्न असलेल्या डॉ. शांती पटेल आणि क ॉ. एस. आर. कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील कामगार संघटनांनी गोदीमध्ये 100 टक्के बंद केला आहे. त्यामुळे मालाची चढ-उतार पूर्णपणे ठप्प झाली आहे. या संपामुळे मुंबई बंदराचे एका दिवसाचे 4 कोटी तर इतर बंदरांचे 50 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मुंबई बंदरातील 16 हजार कामगारांनी या बंदमध्ये सहभाग घेतला आहे.



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad