मुंबई : मुंबईत मलेरिया नियंत्रणात आणण्यासाठी यश आले असले तरी आमच्यापुढे डेंग्यूचे मोठे आव्हान आहे. मलेरिया प्रमाणेच डेंग्यूला आळा घालण्यात नक्कीच यश मिळेल, असा विश्वास पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी व्यक्त केला.
मलेरिया-लघुपट व पुस्तिकेचे प्रकाशन शुक्रवारी महापौर सुनील प्रभू यांच्या हस्ते पालिका मुख्यालयात पार पडले. याप्रसंगी आयुक्त सीताराम कुंटे, अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर, सभागृह नेते यशोधर फणसे, स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे, मनसेचे गटनेते दिलीप लांडे, सपाचे गटनेते रईस शेख, आरोग्य समिती अध्यक्ष गीता गवळी आदी मान्यवर उपस्थित होते. यासंदर्भात बोलताना आयुक्त पुढे म्हणाले की, २00९ व २0१0 मध्ये मलेरियाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात वाढला. मलेरियाच्या प्रतिबंधासाठी पालिका प्रशासनाने ज्या उपाययोजना राबवल्या त्याची तशीच जनजागृतीची माहिती या पुस्तिकेत देण्यात आली आहे.
मलेरिया नियंत्रणात आणण्यासाठी पालिका अधिकार्यांनी जे प्रयत्न केले ते वाखाणण्या जोगे आहे. मलेरिया रोखण्यात यश आले, ही कौतुकास्पद बाब असली तरी आमच्यापुढे डेंग्यूचे आव्हान आहे. मलेरिया प्रमाणे डेंग्यू नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावीपणे उपाययोजना करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. दिल्ली-नोएडा येथे डेंग्यूचे प्रमाण अधिक आहे. पालिकेतील अधिकार्यांनी डेंग्यूच्या उपाययोजनासाठी यशस्वी मोहीम राबवून डेंग्यू नियंत्रणात आणावा. जेणे करून तेथील डेंग्यू रोखण्याबाबत काय उपाययोजना कराव्यात याचा सल्ला तेथील अधिकार्यांना पालिका अधिकार्यांकडून घेण्याची वेळ येईल, असेही त्यानी सांगितले.
२0१0 मध्ये मलेरिया हा चिंतेचा विषय होता, मात्र मुंबई मंत्र-पंचसूत्र कार्यक्रमामुळे मलेरियाला अटकाव करण्यात मोठे यश मिळाल्याने मलेरियाचा प्रादुर्भाव कमी झाला, असे अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यानी सांगितले. मलेरियाचे पालिकेपुढे मोठे आव्हान होते, मात्र पालिका प्रशाससानाने हाती घेतलेल्या यशस्वी मोहिमेमुळे मलेरिया पूर्णपणे रोखण्यात पालिका प्रशासनाला यश आले, असे महापौर सुनील प्रभू यांनी या वेळी सांगितले. मुंबईतील अग्निशमन दलाची माहिती व्हावी याकरिता जनजागृती करण्याकरिता प्रशासनाने मास्टर प्लॅन तयार करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
No comments:
Post a Comment