आघाडी सरकार खिसेकापूं - उद्धव ठाकरे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 February 2013

आघाडी सरकार खिसेकापूं - उद्धव ठाकरे


१२ वीच्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ देवू नका 
मुंबई - केंद्र आणि राज्यातील आघाडीची सरकारे केवळ खिसेकापूंची असून भ्रष्टाचार पचवण्याशिवाय त्यांना काही करता येत नाही, अशी टीका करतानाच २१ फेब्रुवारीला १२ वीच्या परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांना कोणताही प्रकारचा त्रास कामगार किंवा कामगार संघटनांनी करू नये असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केली. डावे पक्ष आणि शिवसेनाप्रणीत ३५ कामगार संघटनांच्या वतीने मुंबईत सोमवारी विशाल मोर्चा काढण्यात आला होता, या वेळी ते बोलत होते.

२० आणि २१ फेब्रुवारी रोजी कामगार संघटनांनी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर शक्तिप्रदर्शन करण्यासाठी सोमवारी काढण्यात आलेल्या मोर्चात आयटक, इंटक, सिटू, भारतीय कामगार सेनेचे कामगार सहभागी झाले होते. आझाद मैदानात मोर्चेक-यांना उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर, महापौर सुनील प्रभू, मनोहर जोशी, मोहन रावले, आदित्य ठाकरे, नीलम गो-हे होत्या. तर डाव्या संघटनांचे के. एल. बजाज, उदय भट, डॉ. विवेक माँटेरो, र. ग. कर्णिक, प्रकाश रेड्डी, शांती पटेल आदी दिग्गजही उपस्थित होते. 

कामगारांचे संसार उद्ध्वस्त होत असताना राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नेते मात्र भोजनावळी घालण्यात दंग असल्याचा आरोप उद्धव यांनी केला. दिल्लीतील यूपीए सरकारला आगामी निवडणुकीत घरी बसवण्यासाठी सर्व कामगार संघटनांनी एकत्र यावे असे आवाहनही त्यांनी केले. "पानिपतच्या लढाईत जेवणासाठीही वेगवेगळ्या चुली पेटविणाऱ्या मराठ्यांमुळे अब्दालीचे फावले होते. तेव्हा कामगार संघटनांनी आता एकत्र येऊन एकच होळी पेटवून कॉंग्रेस सरकारला भस्मसात करावे'', असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. 

बाळासाहेब ठाकरे यांच्या विक्रमी सभांचे मतांमध्ये रूपांतर झाले नसल्याची टिप्पणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्याचा दाखला देत उद्धव ठाकरे यांनी पवारांवर टीका केली. 1999 मध्ये युतीची सत्ता काही कारणांमुळे आली नाही. नाही तर अजित पवारांना शेती करायला जावे लागले असते, असा टोला त्यांनी लगावला. शिवसेनाप्रमुखांनी कधीही विश्‍वासघाताचे राजकारण केले नाही. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांवर आधारित सत्ता महाराष्ट्रात आणणारच, असा विश्‍वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.

विद्यार्थ्यांना त्रास देऊ नका
बंदच्या काळात बारावीच्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ देऊ नका, असे आवाहन उद्धव यांनी केले. या परीक्षेला बसणाऱ्या लाखो मुलांमध्ये कामगारांचीही मुले आहेत. तेव्हा कोणीही या मुलांच्या शैक्षणिक भविष्याच्या आड येऊ नये, असे त्यांनी सांगितले. 

मोर्चाचा फज्जा
भायखळ्याच्या वीर जिजामाता उद्यान ते आझाद मैदान दरम्यान ३५ संघटनांनी एकत्र एवुन मोर्चा काढला हा मोर्चा लाखोंचा असेल सांगण्यात आले होते. लाल बावटा संघटनानी शिवसेनेचे  प्रथमच नेतृत्व स्वीकारल्याने या मोर्चामध्ये १ लाखाहून अधिक कामगार सहभागी होतील असे चर्चिले जात असतानाच आझाद मैदान येथे झालेल्या सभेवेळी ३ हजार कामगारांची उपस्थिती असल्याने कामगारांच्या मोर्चाचा फज्जा उडाला आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad