मृत व्यक्तीची नोंद जन्म नोंदवहीत
मुंबई : मुंबईतील सायन हिंदू स्मशानभूमीत मृत व्यक्तीची नोंद मृत नोंदवहीऐवजी जन्माच्या नोंदवहीत खुलेआम केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या रजिस्टरमध्ये जन्म झालेल्या बाळाचे नाव या कॉलमखाली मृत व्यक्तीचे नाव नोंदवले जाते. जन्म तारखेच्या खाली मयत झालेल्या व्यक्तीची तारीख लिहिली जात असून या ठिकाणी जन्माचे ठिकाण या रकाण्यात मृत व्यक्तीचा पत्ता लिहिला जात आहे. थोडक्यात बर्थ रजिस्टरचा उपयोग डेथ रजिस्टरसाठी केला जात असल्याचा आरोप करीत भाजपाचे नगरसेवक विनोद शेलार यांनी पालिकेकडून स्मशानभूमीला रजिस्टर का पुरविले जात नाही, असा सवाल केला आहे. 2013-14 या वर्षाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये लाकडाचा वापर होणार्या स्मशानभूमीचे ग्रीन स्मशानभूमीमध्ये रूपांतर करण्यासाठी 4.94 कोटींची तरतूद केली असून सौंदर्यीकरणासाठी दोन कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सायन स्मशानभूमीतील एक विद्युतदाहिनी गेल्या दीड वर्षापासून बंद असून दुसरीही चार दिवसांपूर्वी प्रेत जळत असताना स्फोट झाल्याने बंद पडलेली आहे. पालिका सर्व स्मशानभूमीत प्रत्येकी 300 किलो लाकडे मोफत उपलब्ध करून देते. तरीही लाकडांचे पैसे घेऊन मृत व्यक्तींच्या नातेवाईकांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप विनोद शेलार यांनी केला आहे.
हिंदू स्मशानभूमीतून मुस्लीम व ख्रिश्चन समाजाच्या मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्काराची परवानगी देण्यासाठी जो फॉर्म दिला जातो तो उपलब्ध नसल्याने बर्याच स्मशानभूमींमध्ये साध्या कागदावर परवानगी दिली जाते. मृत्यू प्रमाणपत्रासारख्या अतिमहत्त्वाच्या कागदपत्रासाठी हलगर्जीपणा केला जातो, ही अत्यंत खेदजनक बाब असल्याचे शेलार यांनी सांगितले. पश्चिम मुंबईतील जवळपास सर्वच्या सर्व स्मशानभूमींतील पालिकेच्या कर्मचार्यांना कित्येक वर्षे कपडे, टॉवेल, हातरुमाल, साबन, कुदळ, फावडा इत्यादी वस्तू देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या कर्मचार्यांना स्वत: पदरमोड करून या वस्तू आणाव्या लागतात. याकडे पालिकेचे दुलक्र्ष असणे ही निंदनीय बाब असल्याचे शेलार यांनी सांगितले. या सर्व बाबींचा विचार करून आयुक्तांनी या प्रकरणी लक्ष घालावे, अशी विनंती शेलार यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment