संपाला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज - मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 February 2013

संपाला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज - मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया


मुंबई - कामगार संघटनांनी 20 आणि 21 फेब्रुवारीला पुकारलेल्या देशव्यापी संपाला तोंड देण्यासाठी राज्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहेत. वीजपुरवठा, पाणीपुरवठा, आरोग्य, वाहतूक आदी अत्यावश्‍यक सेवा सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना तातडीने हाती घेतल्या आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांनी आज दिली.

कामगार संघटनांनी 20 आणि 21 फेब्रुवारीला पुकारलेल्या संपाच्या पार्श्‍वभूमीवर उपाययोजनांचा आढावा घेणारी बैठक आज मंत्रालयात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झाली. राज्यातील सर्व भागांत पाणीपुरवठा, वाहतूक आणि आरोग्यसेवेवर अनिष्ट परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे बांठिया यांनी सांगितले. राज्य सरकारच्या विविध विभागांनी मंत्रालय नियंत्रण कक्षाशी (दूरध्वनी क्र. 022-22027990) समन्वय ठेवून दर दोन तासांनी संपकाळातील परिस्थितीबाबत अहवाल द्यावा. विद्यार्थी, महिला, अपंग, ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्यावी, असे आदेशही मुख्य सचिवांनी दिले आहेत.

संपात डॉक्‍टर सहभागी होणार नसल्याने आरोग्यसेवेला फटका बसणार नाही. आवश्‍यकता वाटल्यास परिविक्षाधीन परिचारकांची मदत घेण्यात येईल. संपाला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज असून, सर्व संबंधितांना प्रमाणित कार्यचालन पद्धतीनुसार (एसओपी - स्टॅण्डर्ड ऑपरेशन प्रोसिजर) कर्तव्य बजावण्याच्या सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत गृह, आरोग्य, मुंबई महापालिका, मध्य आणि पश्‍चिम रेल्वे, बेस्ट उपक्रम, राज्य परिवहन; तसेच सामान्य प्रशासन विभाग यांनी संपकाळासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. या वेळी सर्व प्रमुख विभागांचे सचिव आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांसाठी "बेस्ट' व्यवस्था 
बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना रेल्वेस्थानके, बसस्थानकांवरून केंद्रांवर पोहोचणे सोपे व्हावे, यासाठी बेस्ट उपक्रमाने पर्यायी व्यवस्था केली आहे. संपाच्या काळात पाणीपुरवठा, दूधपुरवठा, आरोग्यसेवा, वाहतूक अशा महत्त्वाच्या सेवा सुरळीत राहण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहेत. मुंबईत संपकाळात वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी बेस्ट प्रशासन सज्ज असून, प्रत्येक बेस्ट बसमध्ये एक पोलिस तैनात करण्याची सूचना देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad