महानगरपालिकेत पगार पत्रकाच्या कागदाचा दुष्काळ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 February 2013

महानगरपालिकेत पगार पत्रकाच्या कागदाचा दुष्काळ

चार महिन्यांपासून कर्मचार्‍यांचे हाल
मुंबई : देशातील सर्वात मोठी आणि श्रीमंत महापालिका म्हणून बिरुदावली मिरवणार्‍या आणि 27 हजार कोटींचे बजेट असलेल्या अभिमान सांगणार्‍या मुंबई महापालिकेच्या संगणक कक्षात गेल्या अनेक महिन्यांपासून कागदाचा प्रचंड तुटवडा असल्याने गेल्या चार-पाच महिन्यांपासून पगार पत्रक आणि पगाराच्या स्लिपांवरून पालिका कर्मचार्‍यांची ससेहोलपट सुरू असल्याची धक्कादायक बाब सुरू आहे. जानेवारी महिन्याची वेतनपत्रके आणि स्लिपा अजूनदेखील निम्म्याहून अधिक कर्मचार्‍यांना मिळाल्या नसल्याने कर्मचारी संभ्रमावस्थेत सापडले आहेत.

मुंबई महापालिकेच्या विविध आस्थापनांमध्ये सुमारे सव्वा लाख कर्मचारी कार्यरत आहेत. या विविध आस्थापनांमधील सर्व कर्मचार्‍यांच्या वेतन पत्रकांचे काम पालिकेच्या मुख्यालयातील संगणक कक्षामध्ये केले जाते. हाती आलेल्या माहितीनुसार या संगणक कक्षात वेतन पत्रके तयार करण्यासाठी आवश्यक स्टेशनरीचा गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड तुटवडा जाणवत आहे. उपलब्ध असलेल्या कागदाच्या आधारावर त्यातील काही महिने गेले परंतु गेल्या चार-पाच महिन्यांपासून महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ातून मिळणारे वेतनपत्रक पुढील महिन्याच्या दहा-पंधरा तारखेपर्यंत मिळू लागले पण तेही अर्धवटच.

प्रत्येक अस्थापनाला पुरविण्यात येणार्‍या वेतन पत्रकात त्या अस्थापनामध्ये काम करणार्‍या सर्व कर्मचार्‍यांच्या पगाराच्या पावत्या तीन प्रतीत, सोबत त्याबाबतचे पाच ते सहा गोषवारा (समदी) पत्रके असे मिळून पगार पत्रक देण्यात येते. पगार पत्रके देण्या-घेण्याचे निश्चित वेळापत्रक ठरलेले असते; परंतु गेल्या काही महिन्यांत कागदाच्या तुटवडय़ाअभावी या वेळापत्रकाचे पुरते तीनतेरा वाजले आहेत. मागील चार-पाच महिन्यांपासून कोणत्याच अस्थापनांना पूर्ण पगार पत्रक मिळाले नसल्याची बाब समोर आली आहे. 

अनेक कर्मचार्‍यांना त्यांच्या पगाराच्या पावत्याच मिळत नसल्याने आपला नेमका पगार किती, त्यातून कोणकोणत्या बाबींसाठी किती रुपये कापून गेले, याविषयी निश्चित माहिती मिळत नसल्याने कर्मचार्‍यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हे तीन महिने पालिका कर्मचार्‍यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. कारण या तीन महिन्यांत कर्मचार्‍यांना आपला आयकर कापून द्यायचा असतो; परंतु पगाराच्या स्लिपाच मिळत नसल्याने आपला नेमका आयकर किती कापला गेला, किती कापला जाणार आहे, हे काहीच कळत नसल्याने कर्मचारी धास्तावले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad