मुंबई : मुलींची घटती संख्या ही देशपातळीवर एक गंभीर समस्या बनली आहे. 2011 च्या जनगणनेनुसार ग्रामीण महाराष्ट्राचे दशकापूर्वीचे 916 हे प्रमाण 880 इतके झाले आहे, तर शहरी महाराष्ट्राचे प्रमाण 908 वरून 888 पर्यंत पोहचले आहे. 22 जिल्ह्यांमध्ये स्त्री-पुरुष जननदर राष्ट्रीय सर्वसाधारण दरापेक्षा खालावला आहे. अशा प्रकारे मुलींची संख्या कमी होणे भयावह आहे, असे 'हमारी बेटी' अभियानाच्या अहवालात स्पष्ट केले आहे. पत्रकार संघात गुरुवारी या अहवालातील माहिती प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आली.
गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी गांभीर्याने होताना दिसत नाही. या पाश्र्वभूमीवर राज्यस्तरीय प्रथम संमेलन मुंबईत 28 जानेवारीस बिर्ला मातोश्री सभागृहात होत आहे. मुलीच्या जन्माचे स्वागत करणार्या जोडप्यांचा सत्कार या वेळी करण्यात येणार आहे. पुरुषप्रधान मानसिकतेचा साचा बदलण्यास अभियानात महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे.
जगातील केवळ एक टक्का संपत्ती व संसाधने महिलांच्या नावे आहेत. ही टक्केवारी बदलायची असेल तर या अभियानात मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे. मुलगा-मुलगी असा भेदभाव करू नये. चर्चगेट येथे 28 जानेवारीस निघणारी पदयात्रा व 'हमारी बेटी' अभियान या दोन्ही कार्यक्रमास महिला, पुरुषांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अभियानाच्या वतीने करण्यात आले.
No comments:
Post a Comment