मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागातर्फे परळ येथे 'कल्पतरू' या चार मजली इमारतीचे बांधकाम सुरू असून ही इमारत अद्ययावत प्रशिक्षण केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार असून एपिल्र 2013 मध्ये इमारतीचे काम पूर्ण होणार असल्याचे आपत्कालीन विभागाचे प्रमुख महेश नार्वेकर यांनी सांगितले.
या इमारतीमध्ये आपत्कालीन व्यवस्थापनाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर प्रशिक्षण तसेच प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार आहेत. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांबरोबरच महापालिका, शासकीय यंत्रणांच्या कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर विविध आपत्तीबाबतची माहिती दर्शविणारे प्रदर्शन दालन असणार असून त्याचप्रमाणे भूकंपाचे धक्के किती प्रकारचे आहेत व ते कशाप्रकारे जाणवतात, याचा अनुभव प्रशिक्षणार्थीना तसेच नागरिकांना घेता येईल. पहिल्या मजल्यावर प्रशिक्षण वर्ग तसेच पालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचे प्रतिरूप असलेला धोका नियंत्रण कक्ष जेथे मुख्यालय नियंत्रण कक्षाप्रमाणेच हॉट लाइन्स, बिनतारी यंत्रणा, दूरध्वनी सेवा असणार आहे.
या कक्षाचा वापर मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचा बॅकअप सेंटर म्हणून केला जाणार आहे. इमारतीच्या दुसर्या मजल्यावर वाचनालय व छोटे सभागृह असणार आहे. इमारतीच्या तिसर्या मजल्यावर अतिथीगृह असून प्रशिक्षण देण्याकरिता मुंबईबाहेरून येणार्या तज्ज्ञांची निवासाची व्यवस्था येथे करण्यात येणार आहे. चौथ्या मजल्यावर 200 खुच्र्यांची क्षमता असलेले सभागृह असेल व या सभागृहात '40' प्रकारच्या खुच्र्या असतील, जेणेकरून भूकंप व सुनामी लाटा कशा असतील याचा प्रत्यक्ष अनुभव प्रशिक्षणार्थीना घेता येणार आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असा एक वर्षाचा आपत्ती व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमही असणार असून मुंबई महानगरपालिका ही आशिया खंडातील एकमेव पालिका आहे, जिथे स्वत:चे असे भव्य, सुसज्ज असे प्रशिक्षण केंद्र असणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या अत्याधुनिक आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे जनतेत आपत्तीविषयक जनजागृती करण्याचे कार्य सुरू असून आतापर्यंत विविध अशासकीय संस्था, शाळा, महाविद्यालयांमध्ये तसेच एनएसएसच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये प्रथमोपचार, अपघातात जखमी झालेल्यांना उचलण्याचे प्रशिक्षण तसेच बेसिक आपत्कालीन व्यवस्थापनाचे धडे दिले जात असल्याचे आपत्कालीन विभागाचे प्रमुख महेश नार्वेकर यांनी या विषयासंदर्भातील सादरीकरणाच्या वेळी दिले. हे प्रशिक्षण कोणत्याही सामाजिक संस्थेला मोफत दिले जात असल्याचे नार्वेकर यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे आपत्कालीन परिस्थितीत जनतेला हाताळण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींची मदत घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
चौकट
दैनिक महानानय मध्ये प्रसिद्ध झालेल्या "आपत्कालीन व्यवस्थापन झाला गेमिंग झोन" या बातमी संदर्भात बोलताना आपत्कालीन व्यवस्थापन विभागातील पत्ते खेळणाऱ्या कर्मचाऱ्यांना मेमो दिला असून त्यांची चौकशी करणार असल्याचे तसेच १०८ क्रमांकावर दूरध्वनी करणाऱ्या तक्रारदाराला कर्मचाऱ्यांच्या खाजगी गप्पा या पुढे ऐकू येणार नाही याची दाखल घेवू असे नार्वेकर यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment