गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी मंगळवारी चर्चगेट स्टेशनला पोहोचून तेथे लोकलच्या महिला डब्यात जात महिला प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या.
सायंकाळी ५ च्या सुमारास पाटील स्टेशनमध्ये आले. यावेळी आ. विद्या चव्हाण त्यांच्यासमवेत होत्या. फलाट क्रमांक १, २ आणि ४ वरील लोकल्सच्या महिला राखीव डब्यात गृहमंत्री गेले. आपल्या काही समस्या आहेत का, आपण मोकळेपणाने सांगा, अशी विनंती त्यांनी महिलांना केली. गृहमंत्री आपल्या डब्यात येऊन विचारपूस करताहेत हे बघून महिलांना सुखद धक्का बसला. त्यांनी अनेक अडचणी मांडल्या. डब्यात पुरुष फेरीवाले कधीही येतात, बरेचदा मुद्दाम रेंगाळतात. भिकार्यांचा त्रास नेहमीचाच आहे. फलाटावर गाडी थांबली की फलाटावर काही लोक महिला डब्याजवळ येऊन अश्लील बोलतात वा हावभाव करतात, असे काही महिलांचे म्हणणे होते.
महिलांच्या डब्यात रात्री महिला पोलिस तैनात करावेत, अशी सूचना काही जणींनी केली. देशात सध्या महिलांवरील अत्याचाराचा विषय ऐरणीवर आहे. बलात्काराच्या गुन्हेगारांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, अशी भावनाही काही महिलांनी व्यक्त केली. महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, या शब्दांत पाटील यांनी महिला प्रवाशांना आश्वस्त केले. सुमारे पाऊण तास ते स्टेशनमध्ये होते. त्यानंतर रेल्वे पोलिस आयुक्त प्रभातकुमार, रेल्वे सुरक्षा दलाचे कुंवर, झोन वनचे डीसीपी रवींद्र शिसवे आदी उपस्थित होते. यावेळी सध्या तुमच्याकडे नेमके किती पोलिस कर्मचारी आहेत, याबाबतची माहिती त्वरित देण्याचे आदेश आर.आर. यांनी रेल्वे पोलिस आयुक्त प्रभातकुमार यांना दिले.
No comments:
Post a Comment