मुंबई : महिलांनी अत्याचारापासून कशा प्रकारे सुरक्षित राहून प्रतिकार करावा, याबाबत मुंबई पोलीस व मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात आले. महिलांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांकडून सुरू करण्यात आलेल्या योजनेअंतर्गत मुंबई पोलिसांनी महिलांच्या मदतीसाठी महिला छेडछाड पथकाबरोबरच एक सॉफ्टवेअर तयार केल्याचेही या वेळी सांगण्यात आले.
मंगळवारी बिर्ला मातोश्री सभागृह येथे मुंबई पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष ममता शर्मा, सदस्या निर्मला प्रभावळकर-सामंत आदींच्या उपस्थितीत मुंबई पोलीस वूमन इंटरफेस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महिलांना आपला हक्क व अत्याचाराचा प्रतिकार करून कशा प्रकारे सुरक्षित राहायचे याचे मार्गदर्शन मान्यवरांनी केले. तरुणी तसेच महिलांनी अन्यायाविरोधात आवाज उठवून पोलिसांकडे तक्रार करण्याची हिंमत करावी, जेणेकरून समाजातील विकृत लोकांवर कार्यवाही करता येईल, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
पोलिसांनी महिला छेडछाड पथक तयार केले आहे. हे पथक शाळा, कॉलेजातील विद्यार्थिनींच्या तक्रारींचे निरसन करणार आहे. मुंबई पोलिसांनी असे एक सॉफ्टवेअर तयार केले आहे जेणेकरून मोबाईलचे एक बटन दाबल्यास 10 ठिकाणी एकाच वेळेस संदेश प्रसारित होऊन सर्व दक्ष होतील. महिलांवरील अत्याचारांच्या घटनांत अनोळखी व्यक्तींपेक्षा ओळखीच्या, परिचयाच्या व्यक्तींकडूनच बलात्काराचे अधिक गुन्हे घडल्याचे मुंबई पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांनी सांगून कोणापासून आपल्या मुलांना धोका आहे, हे पालकांनी ओळखले पाहिजे, असेही त्यांनी या वेळी नमूद केले.
No comments:
Post a Comment