परशुराम असो की नथुराम, वादाला साहित्य महामंडळच जबाबदार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 January 2013

परशुराम असो की नथुराम, वादाला साहित्य महामंडळच जबाबदार

नाशिक - परशुराम असो की नथुराम.. साहित्य संमेलनातील अशा सगळ्या वादांना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळच थेट जबाबदार आहे. मात्र, कधी संमेलनाध्यक्ष तर कधी स्वागत समितीला पुढे करून महामंडळ नेहमीच नामानिराळे राहते. संमेलनाबाबतचे सर्वाधिकार महामंडळाकडेच एकवटले असून अध्यक्षपद म्हणजे शोभेचा गणपती झाला आहे.. असे परखड मत माजी संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी व्यक्त केले.

चिपळूण येथे 11 जानेवारीपासून होणाºया अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या तोंडावर निर्माण झालेल्या विविध वादांच्या पार्श्वभूमीवर कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी महामंडळाच्याकार्यशैलीवर तोफ डागली. संमेलनाच्या संपूर्ण प्रक्रियेबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले. साहित्य संमेलनाच्या  आयोजनाचे सगळे अधिकार आणि अर्थातच जबाबदारी साहित्य महामंडळाची आहे. मी ज्या संमेलनाचा अध्यक्ष झालो त्या ठाण्याच्या संमेलनात नथुरामाच्या लेखावरून असाच गदारोळ उडाला. आताही निमंत्रण पत्रिकेवरील परशुरामाच्या चित्रावरून तोच प्रकार सुरू आहे; पण, गौरवग्रंथ असो, स्मरणिका असो की निमंत्रण पत्रिका, महामंडळच त्याला अंतिम स्वरूप देते. मग, इतरांना त्यासाठी जबाबदार धरण्यात काय अर्थ आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
 
 साहित्य संमेलन म्हणजे जणू एखादी जत्रा आहे, त्यामुळे तेथे ‘सब कुछ चलता है’ अशी मनोवृत्ती अलीकडे बळावत असून केवळ एखाद्या वादग्रस्त   मुद्द्याभोवती संमेलन फिरत राहते. या विषयी सुद्धा  साहित्य महामंडळाने गांभीर्याने विचार करायला हवा. तथापि, तसा तो होत नसल्याने त्याच्या उत्तरदायित्वाबाबत आता समाजानेच विचारणा करण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले. संमेलनाध्यक्ष निवडीचा  सारा प्रकार म्हणजे ‘शहाण्यांची गावगुंडी’ असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. या निमित्ताने कांबळे यांनी संमेलनाच्या संपूर्ण प्रक्रियेबाबतच प्रश्न उपस्थित केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad