दलित समाजातील विजय कांबळेंचे नाव मुंबई पोलीस आयुक्तपदासाठी ? - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 January 2013

दलित समाजातील विजय कांबळेंचे नाव मुंबई पोलीस आयुक्तपदासाठी ?

मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या शर्यतीत विजय कांबळे यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. कांबळे हे दलित समाजातील असून आतापर्यंत या समाजाच्या एकाही अधिकार्‍याची या पदावर नियुक्ती झालेली नाही. कांबळे हे सध्या राज्याच्या महामार्ग सुरक्षा विभागाचे अतिरिक्त महासंचालक असून ते सेवेत ज्येष्ठ अधिकारी आहेत. केंद्रीय गृहमंत्रीपदावर सुशीलकुमार शिंदे यांची नियुक्ती झाल्यामुळे कांबळे यांचे नाव आयुक्तपदाच्या शर्यतीत अग्रक्रमावर आल्याचे सांगण्यात आले. शिंदे यांचा कांबळे यांच्या नावाला जोरदार पाठिंबा असल्याने त्यांची या पदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. राज्याच्या गृहरक्षक दलाच्या पोलीस महासंचालक श्रीदेवी गोयल या 28 फेब्रुवारी रोजी निवृत्त होत आहेत. विद्यमान पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांना गोयल यांच्या निवृत्तीनंतर महासंचालकपदी बढती मिळणार आहे. त्यामुळे केवळ दोन महिने सिंह हे आयुक्तपदी राहणार असल्याचे सूत्राने सांगितले.

मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या शर्यतीत सध्या जावेद अहमद, के. पी. रघुवंशी, राकेश मारिया व विजय कांबळे यांची नावे असून दलित अधिकारी म्हणून कांबळे यांच्याच नावाची चर्चा गृह विभागात आहे. जर केंद्र सरकारने मंजूर केलेल्या महासंचालकपदाच्या सहा जागा भरण्याचे राज्य सरकारने ठरवले, तर जावेद अहमद व सत्यपाल सिंह यांना महासंचालकपदावर पदोन्नती दिली जाईल. तसे झाल्यास जावेद अहमद यांचे नाव आयुक्तपदाच्या शर्यतीतून बाद होईल. सेवा ज्येष्ठतेनुसार कांबळे हे ज्येष्ठ आयपीएस अधिकारी असून त्यांनी आतापर्यंत महत्त्वाच्या पदावर चांगले काम केले आहे. दहशतविरोधी पथकाचे प्रमुख राकेश मारिया यांचेही नाव आयुक्तपदाच्या शर्यतीत असून त्यांचे व गृहमंत्री पाटील यांचे संबंध अत्यंत जवळचे आहेत; पण मारिया यांच्या नावाला राज्याचे महासंचालक संजीव दयाळ यांचा विरोध असल्याने त्यांची नियुक्ती या पदावर होण्याची शक्यता कमी असल्याचे कळते. दयाळ यांना जावेद अहमद यांना आयुक्तपदावर आणावयाचे असून त्या दृष्टीने त्यांनी गृहमंत्री व गृह सचिवांकडे फिल्डिंग लावली आहे. पण केंद्रीय गृहमंत्रीपदावर दलित समाजाचे सुशीलकुमार शिंदे यांची नियुक्ती झाल्यामुळे दयाळ यांच्या प्रयत्नांना किती यश येईल, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. कांबळे यांचा कोणीही राजकीय गॉडफादर नसल्यामुळे केवळ शिंदे यांच्या पाठिंब्यावर ते अवलंबून आहेत. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad