पतीने तीन मुलांसह घराबाहेर हाकलून दिलेल्या अमृताला दोन दलाल महिलांनी आश्रय दिला आणि नंतर तिच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिचे एक मूल विकण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून या दोन दलालांसह अमृतालाही अटक केली होती. अमृताविरुद्ध व्यवसायासाठी मूल विकण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे अमृता तुरुंगात अडकली, तर तिची तिन्ही मुले तिच्यापासून दुरावली होती. अमृतावर झालेल्या या अन्यायाला वाचा फोडून रिपाइंच्या महिला आघाडीच्या ऍड. अभया सोनावणे यांनी लढा सुरू करून तिला २० हजार रुपयांचा जामीनही मिळवून दिला.
रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी या महिलेला १५ हजार रुपयांची मदत तसेच नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या महिलेच्या संदर्भात गृहमंत्री आर. आर. पाटील यांची भेट घेवून संबंधित प्रकरणातील पोलिसांची सीआयडी मार्फत चौकशी कार्नायची मागणी करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. यावेळी महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार सारखी प्रकरणे रिपाई महिला आघाडीने शोधून काढावीत व पिडीत महिलांना न्याय मिळवून द्यावा असे आवाहन आठवले यांनी केले.
No comments:
Post a Comment