मुंबई : महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस कारवाईविरोधात तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या धमकीला आव्हान देत फेरीवाल्यांनी पुकारलेल्या एल्गाराची ठिणगी गुरुवारी आझाद मैदानात पडली. मुंबईच्या विविध भागांतून आलेल्या हजारो फेरीवाल्यांनी शक्तिप्रदर्शन करत सरकारी यंत्रणेसह मनसेलाही आपली ताकद दाखविली.
फेरीवाल्यांचे प्रश्न सोडविण्यास सरकार जेवढा वेळ लावेल तेवढय़ा वेळा फेरीवाल्यांचे आंदोलन होणारच. पोलीस किंवा राजकारणी यांना न घाबरता आम्ही आंदोलन करतच राहणार, असे इशारे देत आझाद हॉकर्स युनियनच्या नेतृत्वाखाली मुंबई व उपनगरातील हजारो फेरीवाल्यांनी गुरुवारी आझाद मैदानात शक्तिप्रदर्शन केले. वाकोल्यात फेरीवाल्यांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान एका फेरीवाल्याचा मृत्यू झाला होता. या घटनेचे तीव्र पडसाद उमटत सरकारने सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांची तडकाफडकी बदली करून
फेरीवाल्यांचा उद्रेक शांत करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र फेरीवाल्यांनी अधिक आक्रमक होत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र ढोबळेंना पाठिंबा देत मनसे अणि शिवसेना एकत्रित आली. त्यांनी फेरीवाल्यांविरोधात भूमिका घेतली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय फेरीवाल्यांना विरोध करत मुंबईसह राज्यातील सार्वजनिक स्थळी केवळ भूमिपुत्रांना व्यवसाय करण्यास पाठिंबा दर्शविला होता. तसेच फेरीवाल्यांनी मोर्चा काढल्यास त्यास चोख उत्तर देण्याचा इशाराही दिला होता. या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी मोठय़ा प्रमाणात बंदोबस्त तैनात केला होता. कोणतीही अनुचित घटना घडू नये याची खबरदारी पोलिसांनी घेतली होती.
आझाद मैदानाच्या दिशेने शहर आणि उपनगरातील विविध भागातून येणार्या फेरीवाल्यांनी शांतता व संयम पाळला असतानाच मैदानात झालेल्या जाहीर सभेत मात्र विविध संघटनांच्या नेत्यांनी आक्रमक भाषणे केली. जुन्या फेरीवाल्यांविरोधात पोलिसांची कारवाई बंद करावी, ढोबळे यांच्यावर 304 कलमाखाली कारवाई करावी, पालिकेने थांबवावी, राष्ट्रीय धोरणाची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत फेरीवाल्यांकडून जमा केलेला कोटय़वधी रुपयांचा हप्ता महसूल म्हणून अधिकृत घ्यावा व सरकारी तिजोरीत वाढ करावी, यासह इतर मागण्या फेरीवाला संघटनांच्या नेत्यांनी जाहीर सभेतून केल्या.
No comments:
Post a Comment