मुंबई : ठाणे यार्डच्या रिमोल्डिंगमुळे ठाणे स्थानकात प्रवेश करणार्या लोकलचा वेग वाढणार आहे. क्रॉस ओव्हर आणि इतर तांत्रिक कारणांमुळे ठाणे स्थानकात येणार्या लोकलचा वेग यापूर्वी 10 किमी प्रतितास होता,मात्र आता तो 50 किमी प्रतितासापर्यंत वाढवता येणे शक्य होणार असल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनी सांगितले आहे.
रिमोल्डिंग काळात ठाणे स्टेशन परिसरात 41 नवे सिग्नल उभारण्यात आले आहेत.तसेच पूर्वीचे ट्रॅक आणि सिग्नलची जागाही बदलण्यात आली आहे. मोटरमनना या नव्या सिग्नल यंत्रणेशी ताळमेळ जमवता आला नाही. त्यामुळे मोटरमन नव्या सिग्नल प्रणालीचा अंदाज घेऊन सावकाश लोकल चालवत आहे. नव्या सिग्नल प्रणालीमुळे लोकल, लांब पल्ल्याच्या गाडय़ांना सिग्नलचे मार्गदर्शन करणारी ट्रेन मॅनेजमेंट सिस्टिम (टीएमएस) यंत्रणा बाद झाली आहे. या टीएमएस यंत्रणेमुळे प्लॅटफॉर्मवरील इंडिकेटरवरील वेळ आणि अपेक्षित वेळ दिसते; परंतु ही व्यवस्था कार्यरत नसल्यामुळे इंडिकेटर नादुरुस्त झाले आहेत. टीएमएस यंत्रणेत नव्या सिग्नल प्रणालीनुसार आवश्यक बदल करण्यासाठी बॉम्बार्डियर कंपनीस काही वेळ लागणार आहे. रिमोल्डिंगनंतर पुढील काळात ठाणे स्टेशनमध्ये आणखी काम हाती घेण्यात येणार आहे. यामध्ये ठाणे स्टेशनमधील प्लॅटफॉर्म क्र. 3 आणि 4 ची लांबी वाढवून 24 डब्यांपर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाडय़ा दोन वेळा थांबणार नाहीत आणि 15 मिनिटांचा वेळ वाचणार आहे.
काही काळ त्रास होणार
रिमोल्डिंगच्या तांत्रिकदृष्टय़ा किचकट कामाद्वारे निर्माण झालेला घोळ निस्तारण्यास आणखी काही दिवस लागणार आहेत. मेगाब्लॉकच्या काळात घेण्यात आलेली उर्वरित कामे येत्या काळात पूर्ण करण्यात येणार आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या सिग्नल यंत्रणेची सांगड घालण्यात लागणारा वेळ यासाठी महत्त्वाचे कारण आहे. रिमोल्डिंग आणि मेगाब्लॉक काळात लोकल सेवा बंद करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे लोकल धावत असताना कामे सुरू असतानाच काम हाती घेतल्याचे जैन यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment