मुंबई : आधुनिक युगामध्ये घरचे पाणी, जेवण घेऊनच बाहेर पडावे. सायंकाळी 7 नंतर जेवू नये. रोज 45 मिनिटे व्यायाम करावा. तरच आरोग्य ठीक राहील, असे जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी पत्रकार संघ येथे वार्तालाप कार्यक्रमात सांगितले.
मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष देवदास मटाले, कार्यावाह विजयकुमार बांदल, प्रभाकर राणे या वेळी उपस्थित होते. या वेळी तात्याराव लहाने म्हणाले, 649 कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत. त्या पैशांतून 19 गाळय़ांचे अत्याधुनिक आठ लाख चौ. मीटरचे रुग्णालय उभारणार आहे. विविध आजारांसाठी या ठिकाणी कक्ष असणार आहेत. गेल्या 3 वर्षामध्ये मी रुग्णालयामध्ये बरीच सुधारणा केली. मात्र स्वच्छतेबाबत मोठय़ा प्रमाणात जनजागृतीची गरज आहे. भारतामध्ये कायदे करणारे आहेत, मात्र पाळणारे कमी आहेत.
खाजगी रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया किंवा इतर उपचारादरम्यान दगावलेल्या रुग्णांची बातमी वृत्तपत्रात येत नाही, मात्र जे. जे.मध्ये न दगावलेल्या रुग्णांची मृत म्हणून बातमी येते. असा भेदभाव पत्रकारांनी का केला? असा सवाल लहाने यांनी या वेळी केला. जसलोक, हिंदुजा, बॉम्बे रुग्णालयामध्ये एंजिओग्राफीमध्ये 9 जण मृत पावले त्याची बातमी आली नाही. पत्रकारांनी याचा गांभीर्याने विचार करावा. जे. जे.मध्ये काय सुधारणा हवी आहे, याबाबत पत्रकारांनीही सूचना कराव्यात. गोरगरीब माणसाठीच हे रुग्णालय आहे, असे समजून बातम्या लिहा, असे लहाने म्हणाले. माणसांनी माझ्यावर खूप प्रेम केले आहे, करत आहेत. त्यांच्या प्रेमाचा विश्वासघात करणार नाही. गोरगरीबांच्या सेवेसाठी जे. जे.मध्ये जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे करत राहाणार, असे त्यांनी सांगितले.
जे. जे. रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना नेटवरून थेट भेटता येणार आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून हे रुग्ण घरबसल्या पाहता येण्यासाठी लहाने यांनी ही संकल्पना राबविण्याचे ठरवले आहे.
No comments:
Post a Comment