मुंबई महानगर पालिकेमध्ये मराठी भाषेमध्ये कारभार चालावा यासाठी मराठी भाषा सक्तीची करण्यात आली आहे. पालिकेने तसा ठराव सुद्धा केला आहे. पालिकेमध्ये मराठी सक्तीची केल्यावर पालिकेचा कारभार मराठी मध्ये चालेल अशी अपेक्षा असताना आजही पालिकेमध्ये कित्तेक विभागामध्ये इंग्रजी मध्ये कारभार केला जात आहे. पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्या आदेशाने पालिकेतील विविध विभागांची माहिती वृत्तपत्र व पत्रकारांच्या माध्यमाने नागरिकांना व्हावी यासाठी गेले चार आठवडे सुधार, आरोग्य, डीपी, शिक्षण, या विभागांचे सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणा दरम्यान पालिकेमध्ये मराठी सक्तीची असताना पत्रकारांना इंग्रजी भाषेतून माहिती देण्यात येत आहे.
संगणकावर मराठी भाषा टाइप करण्यास वेळ लागत असल्याने इंग्रजी मध्ये माहिती देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात येत असले तरी प्रत्येक विभागाला आपली सादरीकरण कधी करायचे आहे याचा वर्षभराचा आराखडा आधीच तयार झाला आहे. संबंधित विभागाने आपले सादरीकरण ज्यादिवशी आहे त्या आधीच तयारी करून यावे अशी अपेक्षा असताना पालिकेमधील विविध विभाग पत्रकारांना आयुक्तांच्या आदेशाने पालिकेच्या नियमांचा भंग करून माहिती द्यायची म्हणून देण्याचे काम करत आहेत.
शिक्षण विभागाचे सादरीकरण करताना तर शिक्षण समितीचे अध्यक्ष भाजपचे विठ्ठल खरटमोल स्वता जातीने हजार होते. अधिकारी मराठी मध्ये बोलत असले तरी सर्व सादरीकरणाची सर्व कागदपत्रे इंग्रजी मधून होती. विठ्ठल खरटमोल इंग्रजीमध्ये असलेल्या सादरीकरणावर काहीतरी बोलतील अशी अपेक्षा केली जात होती परंतु मराठीची गळचेपी खरटमोल गप्प बसून बघत होते. पालिकेमध्ये नव्याने येणाऱ्या योजनाबाबत असेच सादरीकरण पालिकेच्या स्थायी समितीमध्ये, सभागृहामध्ये केले जाते तेव्हा सुद्धा इंग्रजीचा सर्रास वापर केला जात असताना स्थायी समिती सदस्य व सभागृहामधील सदस्य सुद्धा मराठीचा वापर होत नसल्याबाबत कोणताही प्रश्न उपस्थित करत नाहीत हि शरमेची बाब म्हणावी लागेल.
मुंबईकराना पालिकेची माहिती उपलब्ध करून देणाऱ्या जनसंपर्क विभागाकडूनही अशीच मराठीची गळचेपी केली जात आहे. जनसंपर्क विभागाकडे पालिकेच्या विविध विभागाकडून येणाऱ्या जाहिराती इंग्रजी मधून पाठवल्या जातात. विविध विभाग मराठी भाषेची गळचेपी करून इंग्रजी मध्ये जाहिराती पाठवत असले तरी जनसंपर्क विभागाने या जाहिराती पालिकेच्या शंभर टक्के मराठी या धोरण प्रमाणे जाहिराती मराठी भाषेमध्ये देणे जरुरीचे असताना जनसंपर्क विभागाकडून इंग्रजी मधून जश्या जाहिराती येतात तशाच जाहिराती वृत्तपत्रांना पाठवत आहेत. वास्तवीक पाहता इतर भाषिक वृत्तपत्रांना इंग्रजीमध्ये जाहिराती देण्याचे समजू शकते परंतु मराठी भाषिक वृत्तपत्रांना सुद्धा इंग्रजीमध्येच जाहिराती दिल्या जात आहेत. पालिकेचे काम शंभर टक्के मराठी मध्ये चालावे अशी सक्ती असताना जाहिराती मराठी मधून का नाही असे विचारल्यावर जाहिराती मराठी मध्ये अनुवादित करायचे काम वृत्तपत्राचे आहे आमचे नाही असे जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात येते.
पालिकेमध्ये शंभर टक्के मराठी भाषेमधून कारभार करावा अशी सक्ती असताना पालिकेच्या विविध विभागांकडून मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रकार पालिकेमधील विविध विभाग करत आहेत. पालिकेमधील विविध विभागांकडून मराठीची गळचेपी सुरु असताना मराठी भाषा सक्तीची करणाऱ्या शिवसेना भाजपचे दुर्लक्ष होत असताना दिसत आहे. पालिकेमधील सत्ताधारी शिवसेना भाजपचे पदाधिकारी सत्तेमध्ये धुंद असल्याने मराठीच्या गळचेपीकडे दुर्लक्ष होत असावे. परंतु विरोधी पक्षांचे व विशेष करून मराठी भाषेसाठी, मराठी भाषिकांसाठी भांडणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुद्धा दुर्लक्ष होत आहे. यामुळे पालिकेमध्ये मराठी सक्तीची असली तरी पालिकेमध्ये मराठीची गळचेपी करून नियम कायदे धाब्यावर बसवून इंग्रजीमध्ये खुलेआम कारभार चालू आहे. नियम कायदे पायदळी तुडवून कारभार करणाऱ्या प्रशासनावर सध्या तरी कोणाचाही अंकुश नसल्याचे दिसत आहे.
पालिकेमध्ये मराठीची गळचेपी होत असताना सत्ताधारी पदाधिकाऱ्यांचे खास आशीर्वाद असलेले मराठी वृत्तपत्रांचे पत्रकार सुद्धा गप्प बसून तमाशा बघत आहेत. आयुक्तांच्या आदेशाने विविध विभागांचे सादरीकरण इंग्रजी मध्ये सुरु असताना जनसंपर्क अधिकारी विजय खबाले पाटील यांना मराठी भाषेचा वापर होत नसल्याने पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुढील सादरीकरण पुन्हा इंग्रजी भाषेमध्ये सादर केल्यास मराठी भाषिक पत्रकारांनी सादरीकरणावेळी बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. यापुढील सर्व सादरीकरण मराठी भाषेमध्ये असतील असे आश्वासन खबाले पाटील यांनी दिले असले तरी पालिकेतील सत्ताधारी, विरोधकांचा प्रशासनावर वचक राहीला नसल्याने मराठी भाषिक पत्रकारांनी बहिष्कार टाकल्यास झोपेचे सोंग घेतलेल्या सत्ताधारी व विरोधकाना मराठी भाषेच्या मुद्यावर जागे करण्यास मदतच होईल.
अजेयकुमार जाधव
मो. ०९९६९१९१३६३
No comments:
Post a Comment