टाटाच्या कोळशावर परावर्तित वीज प्रकल्पाला सेनेचा .विरोध - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 January 2013

टाटाच्या कोळशावर परावर्तित वीज प्रकल्पाला सेनेचा .विरोध

मुंबई : मुंबईतील चेंबूर येथल्या माहुल परिसरात असणारा टाटा पॉवर वीज प्रकल्पाचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून टाटा कंपनी हा तेलावर चालणारा प्रकल्प कोळशावर परावर्तित करणार आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल, असा आक्षेप शिवसेनेने घेतला आहे. या
परिसरातील नागरिकांच्या जीवनाशी खेळू नका, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

चेंबूर येथील या प्रकल्पाला कोळशावर परावर्तित केल्यानंतर त्यासाठी मोठय़ा प्रमाणात कोळसा वापरण्यात येणार आहे. त्यातून निर्माण होणार्‍या धूर आणि राखेमुळे प्रदूषणात अधिक भर पडणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित असल्याची खात्री पटत नाही तोपर्यंत या प्रकल्पास मंजुरी देण्यात येऊ नये अशी शिवसेनेची भूमिका असल्याचे शिवसेना विधिमंडळ गटनेते सुभाष देसाई यांनी सांगितले. शिवसेना भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

15 जानेवारी रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे होणार्‍या जनसुनावणीत शिवसेना प्रतिनिधी स्थानिक
जनतेच्या दृष्टीने हा प्रकल्प कसा घातक ठरेल, हे मांडणार असल्याचेही ते म्हणाले. चेंबूर परिसरात असणार्‍या रासायनिक कारखान्यांमुळे प्रदूषणात वाढ झाल्याने कर्करोगाच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. नागरिकांना श्वसनाचे विकारही जडले आहेत. कोळशावर आधारित हा प्रकल्प सुरू झाल्याने नागरिकांच्या आजारात वाढच होईल, अशी भीती सुभाष देसाई यांनी व्यक्त केली. या प्रकल्पाबाबत त्रयस्थ संस्थेकडून अहवाल मागविण्यात यावा, अशी मागणीही सुभाष देसाई यांनी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad