मुंबई : मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील पुनर्विकासासाठी 104 प्रकल्पांना मान्यता दिलेली होती. त्यातील 41 प्रकल्पांचे भांडवली मूल्याचे 628 कोटी 3 लाख 24 हजार 927 रुपये इतकी रक्कम विकासकांकडून थकविण्यात आली असल्याचा गौप्यस्फोट आरपीआय आठवले गटाचे मुंबई प्रदेश युवा संघटक दिलीप गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केला. या संदर्भात पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.
मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील 104 पुनर्विकास प्रकल्पांना मंजुरी दिली. त्यापैकी 81 प्रकल्पांचे भांडवली मूल्य 1036 कोटी दाखविण्यात आले, तर 23 प्रकल्पांचे भांडवली मूल्य शून्य दाखविण्यात आल्याचे माहिती अधिकारात उपलब्ध झालेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट झाल्याचे गायकवाड यांनी सांगितले. 23 प्रकल्पांचे भांडवली मूल्य शून्य दाखविताना यातील 6 प्रकल्पांना विकासक नेमण्यात आला नसताना, या प्रकल्पांचे भांडवली मूल्य कोणाकडून व कसे वसूल केले गेले? असा सवाल गायकवाड यांनी केला. याचा अर्थ भांडवली मूल्याच्या वसुलीमध्ये पालिकेच्या अधिकार्यांकडून मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला.
104 प्रकल्पांपैकी 41 ठिकाणच्या प्रकल्पांचे भांडवली मूल्य 628 कोटी रुपये असून मनपाने 18 टक्के व्याजाने ही रक्कम वसूल केल्यास गेल्या 10 वर्षाचे 3287 कोटी रुपये होतात, मात्र ही रक्कम वसूल करण्यास पालिका अधिकारी टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत गायकवाड यांनी या प्रकरणी आयुक्तांनी लक्ष घालावे, अशी मागणी केली.
No comments:
Post a Comment