नवी दिल्ली : 16 डिसेंबर रोजी राजधानीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर जनतेचा पत्कारावा लागलेला रोष लक्षात घेऊन दिल्लीनंतर आता संबंध देशभरात महिलांच्या मदतीसाठी सरकारने '181' या हेल्पलाइन क्रमांकाची सुविधा निर्माण करून देण्याचा निर्णय घेतला आहे. झालेल्या अत्याचाराबाबत या क्रमांकावर माहिती कळवल्यास तत्काळ पोलीस महिलांच्या मदतीला धावून येणार आहेत. या क्रमांकसंदर्भात लवकरच मी देशातील सर्व मुख्यमंर्त्यांना पत्र पाठवणार असल्याची माहिती केंद्रीय दूरसंचारमंत्री कपिल सिब्बल यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
16 डिसेंबर रोजी राजधानी दिल्लीत 23 वर्षीय तरुणी सामूहिक बलात्काराची शिकार ठरली होती. त्यानंतर संबंध देशभरात सरकार आणि पोलिसांच्या विरोधात नागरिकांत तीव्र संतापाची लाट पसरली. दिल्लीतील महिलांसाठी दूरसंचार मंत्रालयाने '167' या हेल्पलाइन क्रमांकाची सुविधा निर्माण केली होती. हा क्रमांक सुरू करण्यासाठी दस्तुरखुद्द मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनीदेखील सरकारकडे आग्रहाची भूमिका मांडली होती. त्यानंतर आता सरकारने संबंध देशभरातील महिलांसाठी '181' या हेल्पलाइन क्रमांकाची सुविधा निर्माण करून देण्याचा निर्णय घेतला असल्याचे केंद्रीय दूरसंचारमंत्री कपिल सिब्बल यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
घरात किंवा बाहेर पुरुषांकडून अत्याचार किंवा इतर कोणतेही संकट आल्यास महिलांनी तत्काळ या क्रमांकावर थेट माहिती कळवावी. जेणे करून झालेल्या अत्याचाराबाबत माहिती मिळाल्यास तत्काळ पोलीस महिलांच्या मदतीला धावून येणार आहेत. या क्रमांकासंदर्भात लवकरच मी देशातील सर्व मुख्यमंर्त्यांना पत्र पाठवणार असून या सुविधेसाठी देशात कॉल सेंटर सुरू करण्याची आवश्यकता पडणार असल्याचेही सिब्बल यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment