एक महिला मृत; 11 जण जखमी
मुंबई : दहिसर पश्चिम येथील गणपत पाटील नगर झोपडपट्टीवर गुरुवारी मुंबई महानगरपालिकेकडून मोठय़ा प्रमाणात कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे 1400 अनधिकृत झोपडय़ा जमीनदोस्त करण्यात आल्या. या कारवाईला मोठय़ा प्रमाणात विरोध झाल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. या लाठीमारात सुमारे 11 जण जखमी झाले. या कारवाईच्या बातमीमुळे यशोदा सुभाष यादव (30) या महिलेचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
गणपत पाटील नगर येथे सुमारे 10 हजार झोपडय़ा असून त्यातील काही झोपडय़ा 1990-1995 पूर्वीच्या आहेत. 38 बांधकामांबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, तर इतर सर्व झोपडय़ा अनधिकृत असून, या ठिकाणच्या तिवरांची झाडे तोडून या उभारण्यात आल्या आहेत. येथील झोपडय़ांवर यापूर्वीही पालिकेने कारवाई केलेली आहे. मात्र राजकीय आश्रयामुळे झोपडय़ांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पालिकेने गुरुवारी न्यायालयाच्या आदेशानुसार येथील अनधिकृत झोपडय़ांवर कारवाई सुरू करून सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत 1400 अनधिकृत झोपडय़ांवर कारवाई केली.
या कारवाईत तिवरांच्या झाडांपासून 50 मीटर अंतरापर्यंतच्या 1400 झोपडय़ांवर कारवाई केली गेली, असे अतिक्रमण विभागाचे आनंद वाराळकर यांनी सांगितले. या कारवाईत पालिकेचे 150 कामगार, 18 डम्पर, 9 जेसीबी, 1 रुग्णवाहिका, 1 टँकर, 1 अग्निश्मन दलाची गाडी यांनी भाग घेतला. ही कारवाई दुपारी 1 वाजल्यापासून सुरू करण्यात आली, तर 5.30 वाजता थांबवण्यात आली. या वेळी सुमारे 500 पोलिसांचा बंदोबस्त देण्यात आला होता. अतिरिक्त पोलीस आयुक्त वारसकर, वनाधिकारी, सहाय्यक आयुक्त संतोष धोंडे, आदी अधिकारी उपस्थित होते.
या अनधिकृत झोपडपट्टीविरोधात होत असलेल्या कारवाईत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी काँग्रेस नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्यावर कारवाई करावी, असे शिवसेना आमदार विनोद घोसाळकर यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment