डिझेलच्या दरवाढीवर होणार बेस्टची भाडेवाढ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 December 2012

डिझेलच्या दरवाढीवर होणार बेस्टची भाडेवाढ

बेस्ट अर्थसंकल्पास स्थायी समितीत मंजुरी
मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या वर्ष 2013-14 च्या 6 हजार 152 कोटी रुपयांच्या आणि 1 लाख रुपये शिलकीच्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने शुक्रवारी मंजुरी दिली. यामुळे भविष्यात डिझेलच्या वाढत्या किमतीवर बेस्टची दरवाढ होणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव लवकरच पालिकेकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे बेस्टचे महाव्यवस्थापक ओ. पी. गुप्ता यांनी सांगितले. 

याशिवाय बेस्टने अर्थसंकल्पात बेस्ट परिवहनचा आणि उपक्रमाचा तोटा भरून काढण्यासाठी 4 टक्के वीज दरवाढ सुचवण्यात आली आहे. महानगरपालिकेने बेस्टला ट्रान्सपोर्ट फंडात वाढ करावी, अशी मागणी या वेळी भाजपाचे गटनेते दिलीप लांडे यांनी केली. तसेच डिझेल आणि सीएनजीवर घेतल्या जाणार्‍या जकातीवर 5 टक्के अधिभार घेतला जातो. ही अधिभाराची रक्कम ट्रान्सपोर्ट फंड म्हणून वापरावी अशी सूचना या वेळी पटेल यांनी केली. वीज ग्राहकांकडून परिवहन शुल्क वसुलीस शिवसेनेच्या डॉ. अनुराधा पेडणेकर यांनी विरोध केला. बेस्टने बसमार्ग बंद करण्यापूर्वी स्थानिक नगरसेवकांना विचारात घ्यावे, अशी सूचना या वेळी रमेश कोरगावंकर, किशोरी पेडणेकर यांनी केली. 

वारंवार होणारी इंधन दरवाढ आणि त्यामुळे बेस्टला होणारे आर्थिक नुकसान लक्षात घेता, यापुढे बेस्ट समितीनेच भाडेवाढ आणि दरवाढीबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी स्थायी समिती किंवा महापालिकेची मंजुरी घ्यावी लागणार नाही, अशी तरतूद पालिका नियमात करण्याचा विचार असल्याचे या वेळी स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad