'सूर्यास्तानंतर महिलांना ताब्यात घेऊ नका' - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 December 2012

'सूर्यास्तानंतर महिलांना ताब्यात घेऊ नका'

उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले
मुंबई : सूर्यास्तानंतर महिलांना पकडणे आणि त्यांना अटक करण्याच्या मुद्दय़ावर मुंबई उच्च न्यायालयाने राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्तांना फटकारले आहे. सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी कोणत्याही महिलेला अटक करू नये अथवा त्यांना ताब्यातही घेऊ नये, अशा प्रकारचे निर्देश सर्व पोलीस ठाण्यांना द्या, असे उच्च न्यायालयाने पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्तांना बजावले आहे.

येत्या दोन आठवडय़ांत सर्वच पोलीस अधिकार्‍यांना गुन्हे दंड संहितेचे कलम 46 (अ)चे काटेकोर पालन करत अपरिहार्य स्थिती वगळता इतर कोणत्याही गुन्ह्यांत आरोपी महिलांना सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी पकडू नये अथवा अटक करू नका, अशी सक्त ताकीद द्या, असे निर्देश न्यायमूर्ती ए. एस. ओका आणि एस. एस. शिंदे यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहेत. या कलमानुसार पोलिसांना सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी एखाद्या महिला आरोपीला अटक करायची असेल तर त्यासाठी त्यांना संबंधित क्षेत्रातील न्याय दंडाधिकार्‍यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. भारती खंदहार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने हे निर्देश दिले. भारती यांना अलाहाबादच्या एका न्यायालयाने जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटनंतर माटुंगा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मारुती जाधव यांनी 13 जून 2007 रोजी सायंकाळी अटक केली होती. त्यांना रात्री 3 तास थांबवून घेतले होते. त्यानंतर दुसरे एक पोलीस उपनिरीक्षक अनंत गुरव यांनी अटक दाखवण्यासाठी कागदोपत्री कारवाई केली होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad