मुंबई : दिल्लीतील अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभरातील या प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत. बहुतांश घटना या ओळखीच्या व्यक्तींकडून घडत असल्यामुळे त्या रोखण्यासाठी मुलुंड पोलिसांनी एक चांगली मोहीम हाती घेतली आहे. आपल्या पालकांच्या नकळत अनेक तरुण-तरुणी प्रेमाच्या नावाखाली अश्लील चाळे करण्यासाठी निर्जन स्थळ किंवा उद्यानांची निवड करतात. चाळे करणार्या या प्रेमीयुगुलांना चाप बसावा म्हणून मुलुंड पोलिसांनी बाग, उद्याने व निर्जन ठिकाणी बसून अश्लील चाळे करणार्या जोडप्यांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे.
मागील तीन दिवसांत पोलिसांनी बगिचे, उद्यानात छापेमारी करून अश्लील चाळे करणार्या 16 जोडप्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांना पालकांच्या ताब्यात दिले आहे. यामध्ये कॉलेजच्या तरुण-तरुणींचे अधिक प्रमाण असल्याचे पोलिसांनी सांगितले. भविष्यात दिल्लीसारखे प्रकार होऊ नयेत. तसेच हे प्रकार रोखण्यासाठी मुलुंड पोलिसांनी वसंत विहार सोसायटी येथील सार्वजनिक उद्यानात नुकतीच छापेमारी केली होती. या छापेमारीत पोलिसांनी अश्लील चाळे करणार्या 16 जोडप्यांना ताब्यात घेऊन त्यांना सज्जड दम दिला. त्यानंतर या जोडप्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून तुमची मुले कॉलेज, क्लासच्या नावाखाली काय करतात असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच पुन्हा त्यांच्याकडून ही चूक होऊ नये म्हणून प्रत्येक जोडप्यावर मुंबई पोलीस अँक्टनुसार 110 प्रमाणे दंडात्मक कारवाई करून त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले. मुलुंड पोलिसांनी राबवलेल्या या मोहिमेचे पालक वर्गाने तसेच कॉलेज व्यवस्थापकांनी स्वागत केले आहे. मुलुंड पोलिसांनी मागील तीन दिवसांपासून ही मोहीम सुरू केली असून या पुढेही ही मोहीम सुरूच राहील, असे पोलिसांनी सांगितले आहे.
No comments:
Post a Comment